ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यात संघटना कार्यरत : महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. जयपाल पाटील

सिनियर जर्नालिस्ट असोसिएशनचा शिर्डीत उत्तर महाराष्ट्र मेळावा उत्साहात

शिर्डी | देश किंवा राज्य पातळीवर तरूण श्रमिक पत्रकारांसाठी काम करणा-या अनेक संघटना आहेत तथापि, आयुष्यभर पत्रकारिता करीत असताना दुसऱ्यांचे प्रश्न सोडविणारा पत्रकार मात्र स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर त्याची परिस्थिती हलाखीची झाली आहे. सेवानिवृत्त वा ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न सोडविणारी एकही संघटना नाही. ही उणीव ‘ सिनियर जर्नालिस्ट असोसिएशन ‘ च्या निमित्ताने भरून निघत आहे. ज्येष्ठ पत्रकार व पत्रकारेतर कर्मचाऱ्यांसाठी ही संघटना आशेचा किरण ठरत असल्याने आपणाला आनंद व समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. जयपाल पाटील यानी गुरुवारी येथे व्यक्त केला.

संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष यादवराव पावसे यांनी शिर्डी येथे निमंत्रित केलेल्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यात डॉ.पाटील बोलत होते. मेळाव्यास सघटनेचे महाराष्ट्र सचिव संजयकुमार जोशी, प्रदेश उपाध्यक्ष व पुणे जिल्हाध्यक्ष मिलींद वैद्य, पुणे शहर व जिल्हा सचिव चंद्रकांत कांबळे तसेच चाळीसगावचे ज्येष्ठ पत्रकार, संपादक व नगरसेवक किसनराव जोर्वेकर, महिला पत्रकार व नगरसेविका सौ.अरुणा जोर्वेकर, संगमनेरचे जेष्ठ पत्रकार व क्रीडा समिक्षक किशोरजी कालडा, सिन्नरचे ज्येष्ठ पत्रकार डॉ.श्यामसुंदर झळके, अकोले येथील सुनील गिते, निरंजन देशमुख, नंदलाल शिंदे, कोपरगाव येथील स़ंजय लाड, आदींसह नासिक, अहिल्यानगर, जळगांव, धुळे, नंदुरबार येथून अनेक ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.

यावेळी संघटनेच्या कोअर समितीने व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यादवराव पावसे यांनी शिफारस केलेल्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष डॉ. जयपाल पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. या ठरावाचे वाचन पुणे जिल्हा सचिव चंद्रकांत कांबळे यांनी केले. ठरावास संजयकुमार जोशी, मिलिंद वैद्य यांनी अनुमोदन दिले.

नव नियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे –

  • उत्तर महाराष्ट्र विभाग उपाध्यक्ष – किसनराव जोर्वेकर
  • उत्तर महाराष्ट्र सचिव – सुनील गिते
  • नाशिक जिल्हा अध्यक्ष -डॉ. श्यामसुंदर झळके
  • अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष – किशोर कालडा
  • अहिल्यानगर जिल्हा सचिव – संजय लाड

निवडलेल्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्यावतीने व उपस्थित पत्रकारांच्यावतीने पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच, संघटनेच्या शिर्ष पदाधिकाऱ्यांचाही शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

आपल्या प्रमुख मार्गदर्शनात डॉ. पाटील म्हणाले, “पत्रकारांची खालावलेली पत-प्रतिष्ठा अस्वस्थ करत आहे. त्यांचा आर्थिक, सामाजिक स्थर उंचावण्यासाठी आपली संघटना नुसते लढत नाही तर स्वतः कृती करीत आहे. पत्रकारांच्या मुलांना व्यवसायासाठी वित्त संस्थांकडून अर्थ सहाय्य मिळवून देत आहे, अल्कलाइन वाँटरनिर्मिती सारख्याउद्योगांतून स्वयंरोजगार, ग्रामीण पत्रकरांच्या मुलांना कुशल प्रशिक्षणाचे तसेच जर्नालिझम, काँम्प्युटर कोर्सेस सारखे उपक्रम संघटना लवकरच पिंपरी चिंचवड येथे राबविणार आहे. पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी पत्रकारांसाठी विश्रामगृहाची व्यवस्था काही दिवसांत सुरू होत आहे. त्याचा अधिकाधीक पत्रकारांनी लाभ घ्यावा.” लहान-मध्यम प्रिंट व डिजिटल मीडियासाठी सरकारी जाहिराती सुरू करण्यासाठी संघटनेची सरकारशी बोलणी चालू असल्याची माहिती देत त्यांनी पंतप्रधान कार्यालयापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत वैयक्तिक अनुभव कथन केले.

हेही वाचा

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू मैदानात! ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार देशातला सर्वात मोठा महामोर्चा

तत्पूर्वी, महाराष्ट्र सचिव संजयकुमार जोशी यांनी लोकशाहीचा चौथा भक्कम आधारस्तंभ असलेल्या माध्यमातून कार्य करणाऱ्या पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांबद्दल आणि निवृत्त झाल्यानंतर त्यांचे होणारे हाल याबद्दल विवेचन केले. अनेक ज्येष्ठ पत्रकारांना हलाखीचे जीवन जगत असताना साधे अधिस्विकृती कार्ड सुद्धा त्यांना मिळालेले नाही याची खंतही व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्विकृती कार्ड मिळणे हा त्यांचा हक्क व अधिकार आहे याची केंद्र व राज्य सरकारला जाणीव करून देण्याची वेळ आली आहे, त्याबद्दल संघटनेच्या माध्यमातून संबंधित खाते, मंत्री व मुख्यमंत्री यांच्यापर्यंत आवाज उठविला जाईल असे ते म्हणाले. तसेच राज्यातील ज्येष्ठ पत्रकार व पत्रकारेतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक गंभीर स्थितीचा आढावा घेऊन संघटना करीत असलेल्या कार्याबाबत अवगत केले. ते म्हणाले, ‘ अल्पावधीत संघटनेचे यश अधोरेखित होत आहे. ज्येष्ठ पत्रकारांच्या पत्नीसह वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करणे, आरोग्य विषयक समस्या सोडविण्याकरिता पुढाकार घेऊन संघटनेने दहा लाखापर्यंत मदत देण्याचा जो उपक्रम हाती घेतला त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारी यांना सन्मान मानधन, अधिस्विकृती कार्ड, प्रवास सवलत, आर्थिक मदत यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. दोनच महिन्यात महाराष्ट्रात सभासद संख्या 750 च्या पुढे गेली आहे.”

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मिलिंद वैद्य यांनी राज्यातील सभासद संख्या आणखी कशी वाढवता येईल, यावर भर देत नवीन पदाधिकारी व उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ” आज साडे सातशेहून अधिक असलेली सदस्य संख्या वाढवण्यासाठी प्रत्येकाने किमान पाच सदस्य सुरवातीला करावेत. संघटना राबवित कसलेले उपक्रम अधिकाधिक पत्रकारांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी स्विकारावी. त्यातूनच ज्येष्ठ पत्रकारांची उन्नती व प्रतिष्ठा वाढेल, असे आवाहन त्यांनी केले.

आपल्या प्रास्ताविकात उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष व निमंत्रक यादवराव पावसे यांनी राज्य कार्यकारणी सदस्य तसेच उपस्थित पत्रकारांचे स्वागत केले. आगामी काळात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसाठी स्वतंत्र बैठकी घेणार असल्याची माहिती देत पत्रकारांच्या आरोग्य विषयक व आर्थिक समस्या त्यांनी विषद केल्या.

उत्तर महाराष्ट्राचे नियुक्त पदाधिकारी किसनराव जोर्वेकर यांनी ज्येष्ठ पत्रकारांची अधिस्विकृती कार्ड देण्यासाठी संबंधित समिती व सरकारकडून अडवणूक केली जात असल्याची तक्रार करून सरसकट अधिस्विकृती कार्ड देण्यात यावे, शासनदरबारी ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळावी, लहान व मध्यम डिजिटल, प्रिंट मीडियासाठी सरकारी जाहिराती देण्यात याव्यात अशा मागण्या मांडत आपल्या 50 वर्षातील पत्रकारितेतील अनुभव स्पष्ट केले.

अहिल्यानगर जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष किशोर कालडा यांनी सामाजिक तसेच क्रिडा, चित्रपट क्षेत्रात राष्ट्रीय व राज्य स्थरावर वावरताना आलेले अनुभव आपल्या शेअरोशायरी अंदाजात सादर करून मेळाव्यात रंगत आणली. हेमामालिनी, धर्मेंद्र, राजेश खन्ना, सुनील गावस्कर, अजित वाडेकर आदींसह अनेक सेलिब्रिटींबरोबरचे किस्से त्यांनी शेअर करत संगमनेरच्या पत्रकारितेत कसे स्थिरावलो ते स्पष्ट केले. पत्रकारापासून विविध संघटनावर काम केले. आता फक्त सिनियर जर्नालिस्ट असोसिएशनसाठी वाहून घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

नाशिकचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. श्यामसुंदर झळके यांनी आपल्या 40 वर्षांतील पत्रकारितेतील अनुभव सांगून पत्रकारांच्या विविध समस्या मांडल्या. संजय लाड, सुनील गिते यानीदेखील आपल्या भाषणात पत्रकारांच्या समस्या मांडून संघटनेच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी आशा व्यक्त केली.

संघटनेचे पुणे शहर जिल्हा सचिव चंद्रकांत कांबळे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून मेळाव्यास उपस्थित राहिलेल्या मान्यवरा़चे व पत्रकारांचे आभार मानले. शेवटी सर्वांनीच श्री साईबाबांच्या या पवित्र शिर्डी भूमीत ‘सिनियर जर्नालिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र’ चे संघटन राज्यात मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करत एकमेकांना शुभेच्छा देत निरोप घेतला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button