दहशतवादाविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’; ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

Narendra Modi | सीमापार सुरू असणाऱ्या दहशतवादी कारवायांविरोधात भारताने स्वीकारलेले शून्य सहनशीलता (Zero-Tolerance) धोरण आज जगासमोर स्पष्टपणे दिसून येत असून, त्याचे ठोस परिणामही समोर येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. आपल्या मासिक ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या १३८ व्या भागात देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी २०१६ च्या ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून देत पाकिस्तानला थेट इशारा दिला.
२८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी लाँच पॅड्स उद्ध्वस्त केले होते. या ऐतिहासिक मोहिमेला उद्या १० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान म्हणाले, “दहा वर्षांपूर्वी आपल्या शूर सैनिकांनी सीमेपलीकडे जाऊन दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. भारतीय जवानांच्या या असीम साहसाने संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले. या कारवाईने भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचे एक धाडसी व नवे उदाहरण जगासमोर ठेवले.”
हेही वाचा
ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यात संघटना कार्यरत : महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. जयपाल पाटील
“दहशतवादाने दिलेल्या जखमांना चोख अन् निर्णायक उत्तर”
१८ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या उरी हल्ल्यानंतर भारताने हे कठोर पाऊल उचलले होते. याचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, “दहशतवादी कारवायांमुळे देशाने दीर्घकाळ सोसलेल्या यातना आणि जखमांना हे भारताचे अत्यंत निर्णायक उत्तर होते. एकेकाळी देशात साखळी बॉम्बस्फोट होणे ही नित्याची बाब मानली जात होती. २००८ चे दिल्लीतील मालिकास्फोट असोत किंवा २६/११ चा मुंबईवरील भ्याड हल्ला असो, अशा घटनांनी देशाला प्रचंड त्रास दिला. मात्र, आजचा भारत दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ वृत्तीने उभा असून आपल्या सीमांचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.”





