भक्तिभावात गणरायाला निरोप; मुंबईतील विसर्जन सोहळा उत्साहात आणि शांततेत पार
मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुका सुरळीत; पोलीस आणि महापालिकेच्या नियोजनाचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन सोहळा भक्तिभावाने पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव चौपाटीवर उपस्थित राहून गणरायावर पुष्पवृष्टी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘कुबुद्धीचे विसर्जन होवो आणि सर्वांना सुबुद्धी मिळो’, अशी प्रार्थना गणरायाकडे केली.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आणि पोलिसांकडून व्यापक व्यवस्था करण्यात आली होती. गिरगाव चौपाटीसह मुंबईतील प्रमुख विसर्जनस्थळी सुरक्षा, आपत्कालीन व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुविधांसाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.
फडणवीसांकडून पोलीस, महापालिकेचे कौतुक
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गणेश विसर्जन मिरवणुका चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले. विशेषतः मुंबई आणि पुणे शहरात पोलीस प्रशासन तसेच महानगरपालिकांनी चांगली व्यवस्था केल्यामुळे विसर्जन मिरवणुका सुरळीत आणि शांततेत पार पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील तसेच जगातील सक्षम पोलीस दलांपैकी एक असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘कुबुद्धीचे विसर्जन करा आणि सगळ्यांनाच सुबुद्धी येवो’, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा – सोशल मीडियातील असत्य-अर्धसत्याच्या पुरातून ‘सत्य’ जनतेपर्यंत पोहोचवा; राज्यपालांचे पत्रकारांना आवाहन
शिस्त आणि पर्यावरणपूरक उत्सवावर शिंदेंचा भर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी शिस्त आणि पर्यावरणपूरकतेच्या आवाहनाला प्रतिसाद देत उत्सव साजरा केल्याचे सांगितले. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवाचे शिस्तबद्ध नियोजन केल्याचेही त्यांनी नमूद केले.
यंदाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने कृत्रिम तलाव, रुग्णवाहिका, क्रेन, मोटरबोटी आणि इतर आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
विविध मान्यवरांची उपस्थिती
या वेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार मिलिंद देवरा, आमदार अमित साटम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई जिल्हाधिकारी आंचल गोयल, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासे, अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, उपायुक्त चंदा जाधव आणि प्रशांत सपकाळ, सहायक आयुक्त संतोष साळुंके तसेच विविध देशांचे भारतातील महावाणिज्यदूत आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.




