सोशल मीडियातील असत्य-अर्धसत्याच्या पुरातून ‘सत्य’ जनतेपर्यंत पोहोचवा; राज्यपालांचे पत्रकारांना आवाहन
पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ; क्षेत्रीय भेटींमुळे विषयाचे समग्र आकलन होण्यास मदत होत असल्याचे जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन

मुंबई : दूरदर्शन, डिजिटल आणि समाजमाध्यमांचा विस्तार झपाट्याने होत असला, तरी वृत्तपत्रांची विश्वासार्हता आजही कायम आहे. समाजमाध्यमांवर असत्य आणि अर्धसत्य माहितीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असताना, त्यातून सत्य वेगळे करून जनतेपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी पत्रकारांची आहे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र भेटीवर आलेल्या छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील तसेच बिहारमधील पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची मुंबईतील लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागीय महासंचालक स्मिता वत्स शर्मा, छत्तीसगड आणि बिहारमधील विविध माध्यम समूहांचे पत्रकार व प्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – रविवारी मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडणार; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
राज्यपाल म्हणाले की, पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. क्षेत्रीय भेटींमुळे पत्रकारांना एखाद्या विषयाचे प्रत्यक्ष आणि समग्र आकलन होण्यास मदत होते. पत्रकार हे शासन आणि समाज यांच्यामधील सेतू म्हणून काम करतात. त्यामुळे हा ‘स्तंभ’ नेहमी सरळ आणि मजबूत असला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
वृत्तांकनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत अचूक माहिती पोहोचवण्याबरोबरच पत्रकारांनी सामाजिक जनजागृतीमध्येही योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. नशामुक्त भारत अभियान, टीबीमुक्त भारत मोहीम यांसारख्या उपक्रमांबाबत जनजागृती करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
शासन विविध योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी करते. या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याबाबत जनजागृती करण्यामध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.





