TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मान्सूनच्या परतीला सुरुवात, तरी महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; पुढील दोन दिवस येलो अलर्ट

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम; विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

नागपूर : देशातून नैर्ऋत्य मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली असली, तरी महाराष्ट्रात अद्याप मान्सूनचा प्रभाव कायम आहे. राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून, यंदा ही प्रक्रिया नेहमीपेक्षा काहीशी उशिराने सुरू झाली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात नव्या हवामान प्रणालीची निर्मिती झाल्याने राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. २१ सप्टेंबरला या प्रणालीचे अवदाबात, तर २२ सप्टेंबरपर्यंत तीव्र अवदाबात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. २३ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ही प्रणाली दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल होऊन पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

सोमवारी अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता

२१ सप्टेंबरला विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड, नाशिकचा घाट परिसर, अहिल्यानगर, पुण्याचा घाट परिसर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

ठाणे, रायगड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि बीड येथे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा –  ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत रामनगरी–गव्हाणे वस्तीत स्वच्छता व सुशोभीकरण

मंगळवारी पावसाचा जोर वाढणार

२२ सप्टेंबरला राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला येलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे.

नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी तुरळक सरी पडू शकतात.

२३ सप्टेंबरपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

२३ सप्टेंबरला राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे. दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता कायम राहणार असली, तरी राज्यातील बहुतांश भागांत हवामान मुख्यतः कोरडे किंवा ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याने आगामी काळात राज्यातील पावसाच्या स्थितीत टप्प्याटप्प्याने बदल होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button