TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात भाजप स्वबळाचीही तयारी; जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

महायुती म्हणून लढण्यास भाजपची पसंती, मात्र गरज पडल्यास दोन्ही जागांवर स्वतंत्रपणे लढण्याची तयारी; मतदार नोंदणीसह पक्षाची मोर्चेबांधणी सुरू

पुणे : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या २०२६ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुका महायुती म्हणून लढण्याची भाजपची भूमिका असली, तरी गरज पडल्यास दोन्ही मतदारसंघांत स्वबळावर लढण्याचीही पक्षाची तयारी असल्याचे संकेत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील जागावाटपाबाबत चर्चेला वेग आला आहे.

पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी सांगितले की, निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढायची की महायुती म्हणून लढायची, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष घेतात. कार्यकर्ते म्हणून पक्षाकडून जो निर्णय घेतला जाईल, त्या परिस्थितीनुसार निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी २०२६ ची मतदारयादी प्रक्रिया पूर्ण झाली असून, अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या विभागात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

हेही वाचा –  मान्सूनच्या परतीला सुरुवात, तरी महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; पुढील दोन दिवस येलो अलर्ट

मागील पराभवाची भरपाई करण्यासाठी मोर्चेबांधणी

मागील निवडणुकीत पदवीधर आणि शिक्षक अशा दोन्ही मतदारसंघांत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते, असे गोरे यांनी नमूद केले. राजकारणात फायदा-नुकसान होत असते; मात्र झालेले नुकसान भरून काढणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

यासाठी भाजपने आतापासूनच संघटनात्मक तयारी सुरू केली असून, मतदार नोंदणीवर विशेष भर देण्यात आल्याचेही गोरे यांनी सांगितले. पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी बैठका आणि संघटनात्मक कार्यक्रम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महायुती की स्वबळ? निर्णयाकडे लक्ष

पुणे विभागातील दोन्ही जागा महायुती म्हणून लढल्यास विजय मिळवता येईल, असा दावा गोरे यांनी केला. त्याचवेळी, पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास भाजप दोन्ही जागांवर ताकदीने लढण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीतील जागावाटप कसे होते आणि भाजप कोणती भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुणे विभागातील या दोन्ही मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून मतदारयादीसह आवश्यक तयारी सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button