लॅबग्रोन डायमंडच्या संपूर्ण मूल्यसाखळीसाठी भारताने जागतिक नेतृत्व करावे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्कमधून एक लाख कोटींची गुंतवणूक, ५० हजार रोजगार अपेक्षित : देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिन्यांचे उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्री व्यवस्थेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी भारतात उभारावी. या उदयोन्मुख क्षेत्रात भारतीय उद्योगाने जागतिक नेतृत्व प्रस्थापित करावे, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
मुंबईत आयोजित ५२ व्या ‘इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’ सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पणन मंत्री जयकुमार रावल, खासदार गोविंद ढोलकिया, आमदार अमित साटम आणि जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष किरीट भन्साळी यांच्यासह उद्योग क्षेत्रातील उद्योजक, निर्यातदार, उत्पादक, बँकर्स आणि महिला उद्योजक उपस्थित होते.
जागतिक बाजारपेठेचा विस्तार होण्याची शक्यता
अमित शाह म्हणाले की, भारताकडे पायाभूत सुविधा, ऊर्जा, भांडवल आणि उद्यमशील व्यापारी वर्गाचे मोठे सामर्थ्य आहे. लॅबग्रोन डायमंडची जागतिक बाजारपेठ आगामी काळात मोठ्या प्रमाणात विस्तारण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय उद्योगाने या संधीचा लाभ घेत केवळ उत्पादनाची गतीच नव्हे, तर व्यवसायाची व्याप्तीही वाढवावी.
भारतीय कंपन्यांनी जागतिक ब्रँड निर्माण करून प्रमुख शहरांमध्ये स्वतःची विक्री केंद्रे उभारावीत. यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे शाह यांनी सांगितले. रत्न व आभूषण उद्योगासाठी नवी मुंबईत मोठी जागा आणि आवश्यक एफएसआय उपलब्ध करून देण्याची भूमिकाही त्यांनी मांडली. हा उद्योग महाराष्ट्राबाहेर जाऊ नये, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असेही त्यांनी नमूद केले.
सुरत-मुंबईचे मोठे योगदान
भारताला रत्न व आभूषण व्यापाराची हजारो वर्षांची परंपरा आहे. कुंदन, मीनाकारी यांसारख्या कलांनी भारतीय आभूषण क्षेत्राला जागतिक ओळख मिळवून दिली. जगभरात पैलू पाडल्या जाणाऱ्या प्रत्येक दहा हिऱ्यांपैकी नऊ हिऱ्यांवर सुरतमध्ये प्रक्रिया होते. सुरतच्या हिरे उद्योगाने लाखो नागरिकांना रोजगार दिला असून, देशाच्या निर्यातीतही मोठे योगदान दिले आहे.
मुंबईने रत्न व आभूषण व्यापाराच्या निर्यातीत महत्त्वाची भूमिका बजावली असून, भारत डायमंड बोर्स हे भारतीय उद्योगाच्या जागतिक सामर्थ्याचे प्रतीक ठरत असल्याचे शाह यांनी सांगितले.
रत्न-आभूषण निर्यात २.४४ लाख कोटींवर
वर्ष २०२५ मध्ये भारताची रत्न व आभूषण निर्यात २ लाख ४४ हजार कोटी रुपयांवर पोहोचली असून, देशाच्या एकूण व्यापारी माल निर्यातीत या क्षेत्राचा ६.३ टक्के वाटा आहे. या उद्योगातून सुमारे ७५ लाख नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे.
भारत कटिंग आणि पॉलिशिंग केलेल्या हिऱ्यांच्या जागतिक प्रक्रियेत आघाडीवर आहे. युरोपियन युनियन, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, ओमान आणि युनायटेड किंगडमसोबतच्या मुक्त व्यापार करारांचा उपयोग करून उद्योगाने नव्या बाजारपेठा शोधाव्यात, असे आवाहन शाह यांनी केले.
हेही वाचा – भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी नागपुरात उच्चस्तरीय समितीचा संवाद
नवी मुंबईत एक लाख कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्कमधून सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० हजार रोजगार निर्माण होतील. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने जागा उपलब्ध करून दिली असून, दसऱ्यापासून प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने २०२५ मध्ये रत्न व आभूषण क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण तयार केले आहे. पारंपरिक व्यवसायाबरोबरच लॅबग्रोन डायमंड उद्योगासाठीही या धोरणात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. रोजगारनिर्मिती आणि निर्यातवाढीला चालना देणाऱ्या या क्षेत्राला आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य सरकार करेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भारत डायमंड बोर्सला वाहतुकीची अखंड जोडणी
भारत डायमंड बोर्स परिसरातील वाढत्या उद्योग आणि रोजगाराच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेवरही भर देण्यात येत आहे. मेट्रो स्थानकातून भारत डायमंड बोर्समध्ये थेट प्रवेश, तसेच वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानकांवरून पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
बुलेट ट्रेन स्थानकाला कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंक, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल-२ आणि उत्तर कोस्टल रोडशी जोडण्यासाठी बोगद्यांद्वारे मार्गिका उभारण्याचे नियोजन आहे. रेल्वे, मेट्रो, रस्ते आणि विमानतळ अशा सर्व वाहतूक सुविधांशी भारत डायमंड बोर्सची अखंड जोडणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचा निर्यातीत सुमारे ५० टक्के वाटा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, देशाच्या रत्न व आभूषण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा सुमारे ५० टक्के आहे. या क्षेत्रातून ५० लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले असून, सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. विकसित भारत २०४७च्या उद्दिष्टपूर्तीत रत्न व आभूषण उद्योगाचे योगदान महत्त्वाचे राहील, असे त्यांनी नमूद केले.
२७ श्रेणींमध्ये पुरस्कार
‘जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल’च्या वतीने आयोजित ५२ व्या ‘इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स २०२६’मध्ये २७ श्रेणींचा समावेश होता. सर्वाधिक उलाढाल, रोजगारनिर्मिती, कर भरणारी कंपनी, कट अँड पॉलिश्ड डायमंड्स, मौल्यवान धातूंचे दागिने, चांदीचे दागिने, रंगीत रत्न, सिंथेटिक स्टोन्स आणि लॅबग्रोन डायमंड्स यांसह विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सामाजिकदृष्ट्या जबाबदार कंपनी, नाविन्यपूर्ण विपणन व ब्रँडिंग, परदेशातील विक्री, महिला उद्योजक, उद्योगाला वित्तपुरवठा करणारी सर्वोत्तम बँक, विशेष सन्मान, जीवनगौरव आणि कर्मचारी पुरस्कारांनीही या सोहळ्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.





