TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंढरीत भाविकांसाठी मोठी बातमी; तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या परवानगीनंतर पुरातत्त्व विभागाकडून कामाला सुरुवात; लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानाचे दीर्घकालीन संरक्षण करण्याचा प्रयत्न

सोलापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवरील रासायनिक लेपनाच्या प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून (ASI) येत्या २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवर संरक्षणात्मक रासायनिक लेपन करण्यात येणार आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी ही माहिती दिली.

लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीची सातत्याने झीज होत असल्याने मंदिर समिती आणि भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. दरम्यान, या रासायनिक लेपनाच्या प्रक्रियेला काही भाविकांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतल्याने प्रक्रिया सुमारे तीन महिने लांबली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने या प्रक्रियेला हिरवा कंदील दिल्यानंतर लेपनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्यानुसार, २२ सप्टेंबर रोजी शेजारतीनंतर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या पथकाकडून प्राथमिक कामाला सुरुवात होणार असून, २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान प्रत्यक्ष रासायनिक लेपनाची प्रक्रिया केली जाणार आहे.

हेही वाचा –  ‘जरांगेंनी सणासुदीच्या काळात सबुरीने घ्यावे’; रामदास कदम यांचा आंदोलनावरून सल्ला

वर्षाला कोट्यवधी भाविकांकडून स्पर्शदर्शन

पंढरपूरमध्ये वर्षाला जवळपास अडीच ते तीन कोटी भाविक विठ्ठलाचे स्पर्शदर्शन घेतात. भाविकांकडून मूर्तीच्या चरणांना सातत्याने स्पर्श आणि मस्तक टेकवले जाते. याशिवाय अभिषेक, तापमानातील बदल आणि वातावरणातील आर्द्रता यामुळे दगडाची झीज होत असल्याचे सांगण्यात येते.

मंदिर शासनाच्या ताब्यात आल्यानंतर विठ्ठल मूर्तीवर पहिले संरक्षणात्मक लेपन १९८८ मध्ये करण्यात आले होते. त्यानंतरही वेगवेगळ्या कालावधीत विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवर चार वेळा लेपनाची प्रक्रिया करावी लागली आहे.

लेपन का केले जाते?

भाविकांचा सातत्याने होणारा स्पर्श, अभिषेक तसेच तापमान आणि आर्द्रतेतील बदलांमुळे मूर्तीच्या दगडाची झीज होते. ही झीज वाढू नये, निर्माण झालेले तडे किंवा पृष्ठभागावरील नुकसान नियंत्रित करता यावे आणि मूर्तीचे दीर्घकालीन संरक्षण व्हावे, यासाठी संरक्षणात्मक लेपन केले जाते.

परंपरेमध्ये या प्रक्रियेला ‘वज्रलेप’ असे संबोधले जाते. मात्र, सध्या पुरातत्त्व विभागाकडून शिफारस करण्यात येणाऱ्या पद्धतीमध्ये मान्यताप्राप्त आधुनिक रासायनिक संरक्षक लेपाचा वापर केला जातो. भारतीय पुरातत्त्व विभागाचे निवृत्त उपसंचालक आणि रसायन तज्ज्ञ विलास पुनीराज यांच्या माहितीनुसार, या प्रक्रियेत इपॉक्सी राळ, दगडाची भुकटी तसेच पाणीरोधक सिलिकॉन आधारित पदार्थांचा वापर केला जातो.

लेपन किती काळ टिकते?

संरक्षणात्मक लेपन किती काळ टिकेल, हे भाविकांचा स्पर्श, अभिषेक तसेच स्थानिक वातावरण यावर अवलंबून असते. पंढरपूरमध्ये यापूर्वी करण्यात आलेले संरक्षणात्मक लेपन साधारण पाच ते सहा वर्षे व्यवस्थित राहिल्याचा अनुभव असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर मूर्तीची पुन्हा झीज झाल्यास आवश्यकतेनुसार नव्याने संरक्षणात्मक प्रक्रिया करावी लागते.

पुरातत्त्व विभागाकडून देशभरात वापरल्या जाणाऱ्या मान्यताप्राप्त पद्धतीनुसारच विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वापरण्यात येणारी रसायने नैसर्गिक घटकांवर आधारित आणि मान्यताप्राप्त असल्याचा दावा संबंधितांकडून करण्यात आला आहे.

विठ्ठलाच्या चरणांची झीज

सध्या विठ्ठल मूर्तीच्या पायाच्या भागात खड्डा पडला असून मोठ्या प्रमाणात झीज झाल्याचे सांगण्यात येत आहे. मूर्तीच्या अन्य भागांनाही संरक्षणात्मक लेपनाची गरज असल्याने ही प्रक्रिया तातडीने करणे आवश्यक असल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे.

त्यामुळे मंदिर समिती आणि प्रशासनाने भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने आता ही प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी केली आहे. लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे दीर्घकालीन संरक्षण करण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button