भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी नागपुरात उच्चस्तरीय समितीचा संवाद
स्पर्धा परीक्षार्थी, पालक, शिक्षकांसह संबंधित घटकांकडून सूचना मागविल्या; १५ सप्टेंबरपर्यंत अभिप्राय देण्याचे आवाहन

नागपूर : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचा संवाद कार्यक्रम बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नागपुरातील नियोजन भवन, सिव्हिल लाइन्स येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रक्रियेत नागपूर महसूल विभागातील स्पर्धा परीक्षार्थी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सूचना व अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले.
यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बिदरी बोलत होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. महानगरपालिका आणि संबंधित विभागांचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.
परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर सूचना मागविल्या
परीक्षा अधिक सुरक्षित आणि निष्पक्ष करण्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेचे मॉडरेशन, डिजिटल अथवा मुद्रित वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, उत्तरपत्रिका व प्रतिसाद नोंदणी तसेच मूल्यांकन प्रक्रियेतील सुधारणा याबाबत सूचना मागविण्यात आल्या आहेत.
याशिवाय बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स आणि सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याबाबतही अभिप्राय अपेक्षित आहेत. पेपरफुटी, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याबाबतही सूचना देता येणार आहेत.
हेही वाचा – श्रीचक्रधर स्वामींच्या मानवतावादी विचारांचा अंगीकार करा; मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
१५ सप्टेंबरपर्यंत अभिप्राय देण्याची मुदत
नागपूर विभागातील संबंधित घटकांकडून सूचना व अभिप्राय संकलित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष मंगळवार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे.
सूचना निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्याकडे सादर करता येतील. तसेच [email protected] या ई-मेलवरही लेखी अभिप्राय पाठविता येणार आहेत.
आधुनिक परीक्षा पद्धतींचाही अभ्यास
इतर राज्ये आणि देशांतील यशस्वी व आधुनिक परीक्षा पद्धतींचा अभ्यास, परीक्षा केंद्रांसाठी किमान पायाभूत व सुरक्षा मानके, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग आणि परीक्षा संस्थांमधील समन्वय याबाबतही सूचना मागविण्यात आल्या आहेत. उमेदवारांसाठी जलद, सुलभ आणि पारदर्शक तक्रार निवारण प्रणाली विकसित करण्याबाबतही अभिप्राय देता येणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर केले जाणार आहेत. समिती या सूचनांचा सखोल अभ्यास करून राज्य शासनाला सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे भरती परीक्षा प्रक्रियेशी संबंधित सर्व घटकांनी या संवाद प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले.




