महाराष्ट्रातील पर्यावरण संवर्धनासाठी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कसोबत सहकार्याची अपेक्षा
सूक्ष्म वन, हवामान कृती आणि उपजीविका विकासासाठी भागीदारीवर भर; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची प्रिन्स रहीम आगा खान यांच्याशी चर्चा

मुंबई : शिया इस्माईली मुस्लिम समाजाचे ५० वे इमाम आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे (AKDN) अध्यक्ष प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांचे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे स्वागत केले. यावेळी पर्यावरण संवर्धन, हवामान कृती, शिक्षण आणि उपजीविका विकासाच्या क्षेत्रातील संभाव्य सहकार्यावर चर्चा झाली.
आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून जगभरातील विविध ठिकाणी ‘सूक्ष्म वन’ (Micro Forest) उभारण्याचे उपक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्येही अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या शक्यता तपासता येतील, असे प्रिन्स रहीम आगा खान यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील विद्यापीठांसोबत पर्यावरण संवर्धन, हवामान कृती आणि संबंधित विषयांवर सहकार्य करण्यास आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कला निश्चितच आवडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरांमध्ये हवामान कृतीवर भर
तीव्र हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क भारतातील अनेक शहरांमध्ये हवामान कृती आराखड्यावर काम करीत आहे. महाराष्ट्रातील शहरे आणि नगरांमध्ये नाविन्यपूर्ण शीतकरण उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याचा स्थानिक समुदायांना लाभ होत असल्याचे प्रिन्स रहीम आगा खान यांनी राज्यपालांना सांगितले.
पुणे, मीरा-भाईंदर, चंद्रपूर यांसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी हवामान कृती, उत्सर्जन कमी करणे आणि शीतकरण उपाययोजनांच्या क्षेत्रात नेटवर्कचे काम सुरू आहे. तसेच वसई परिसरातील तलाव आणि अन्य जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठीही नेटवर्कच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हैदराबाद येथील आगा खान अकादमी तसेच संगीत आणि साहित्य क्षेत्रातील आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या विविध उपक्रमांची माहितीही प्रिन्स रहीम आगा खान यांनी राज्यपालांना दिली.
हेही वाचा – लॅबग्रोन डायमंडच्या संपूर्ण मूल्यसाखळीसाठी भारताने जागतिक नेतृत्व करावे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
आदिवासी, ग्रामीण भागातील उपजीविकेसाठीही सहकार्याची अपेक्षा
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्रातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील उपजीविका विकासाच्या क्षेत्रातही आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कने काम करण्याबाबत विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिक्षण, पर्यावरण, हवामान कृती आणि उपजीविका विकास या क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढल्यास राज्यातील जनतेला दीर्घकालीन आणि अर्थपूर्ण लाभ मिळू शकतील, असे राज्यपालांनी नमूद केले.
आई-वडिलांची छायाचित्रे पाहून प्रिन्स भावूक
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी प्रिन्स रहीम आगा खान यांना विशेष छायाचित्र अल्बम भेट दिला. या अल्बममध्ये त्यांचे दिवंगत वडील करीम आगा खान चौथे आणि त्यांच्या मातोश्रींची गेल्या ५० वर्षांतील तत्कालीन राज्यपालांसोबतची छायाचित्रे होती.
राजभवनातील आपल्या दिवंगत वडिलांच्या आठवणी आणि जुनी छायाचित्रे पाहून प्रिन्स रहीम आगा खान भावूक झाले. “हे खरोखरच भावुक करणारे आहे. अप्रतिम!” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.




