Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

जालना जिल्ह्यात दोन वर्षांत ५०० शाळांचा दर्जेदार विकास; पंकजा मुंडेंचे निर्देश

नवीन वर्षात नवी शाळा’ संकल्पनेतून गुणवत्तापूर्ण शिक्षणासह भौतिक सुविधांवर भर; निधीचा काटेकोर आणि परिणामकारक वापर करण्याच्या सूचना

मुंबई : जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासोबतच विद्यार्थ्यांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. पुढील दोन वर्षांत जिल्ह्यातील ५०० शाळांचा दर्जेदार विकास करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

‘नवीन वर्षात नवी शाळा’ ही संकल्पना घेऊन अभियान स्वरूपात काम करावे आणि जालना जिल्ह्यातील शाळांचा विकास राज्यासाठी आदर्श ठरेल, अशा गुणवत्तेचा असावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत जालना जिल्हा परिषद शाळांच्या विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, मनपा आयुक्त अंजली शर्मा यांच्यासह विविध अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.

यापूर्वी १ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत शाळांचा सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या अहवालावर चर्चा करताना पंकजा मुंडे यांनी शाळांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

हेही वाचा –  कोकणवासीयांचा गणेशोत्सव प्रवास सुखकर; ‘मोदी एक्सप्रेस’ला दादरहून हिरवा झेंडा

निधीचा परिणामकारक वापर करा

शाळा आणि अंगणवाड्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी नियोजनबद्ध, काटेकोर आणि परिणामकारक पद्धतीने खर्च करावा, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच विकासकामांचा दर्जा उत्तम राखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील शाळांचा विकास करताना आदर्श शाळेची संकल्पना डोळ्यासमोर ठेवावी. आकर्षक रंगरंगोटी, स्वच्छ व सुंदर परिसर, आवश्यक पायाभूत सुविधा आणि दर्जेदार बांधकामावर विशेष भर द्यावा. जालना जिल्ह्यात विकसित होणाऱ्या आदर्श शाळांचे अनुकरण राज्यातील तसेच इतर राज्यांतील शाळांनी करावे, अशा दर्जाचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘नवीन वर्षात नवी शाळा’

‘नवीन वर्षात नवी शाळा’ या संकल्पनेतून संबंधित यंत्रणांनी अभियानाच्या स्वरूपात काम करावे. शाळांच्या विकासकामांचा पुढील आढावा घेण्यासाठी आपण स्वतः जालना येथे बैठक घेणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण योजनांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचाही आढावा घेण्यात आला. या योजनांसाठी उपलब्ध निधी निर्धारित वेळेत खर्च करावा. मंजूर कामांना विलंब होणार नाही, याची दक्षता घेऊन सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button