कोयनेचे पाणी मुंबईला आणण्याची जुनी योजना; वीज निर्मितीनंतर समुद्रात जाणारे पाणी वापरणार : मंत्री गिरीश महाजन
सांगली-साताऱ्याचे पाणी वळविणार नसल्याचा दावा; शंका असल्यास विरोधकांसोबत बैठक घेण्याची तयारी

मुंबई : कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मितीनंतर समुद्रात जाणारे पाणी मुंबईला आणण्याची जुनी योजना असून, त्याला पुन्हा चालना देण्याचा विचार सुरू असल्याचे विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. या योजनेत सांगली किंवा सातारा जिल्ह्यातील पाणी घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट करत, विरोधकांच्या मनात शंका असल्यास त्यांच्यासोबत बैठक घेऊन संपूर्ण माहिती देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ ते २०१९ या कालावधीत कोकणातील प्रकल्पांचा आढावा घेताना मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी कोयना प्रकल्पातील पाण्याचा पर्याय विचाराधीन होता. कोयना जलविद्युत प्रकल्पात वीज निर्मिती झाल्यानंतर पाणी वशिष्ठी नदीमार्गे समुद्रात जाते. या पाण्याचा पुढे अन्य उपयोग होत नसल्याने ते मुंबईकडे वळविण्याची योजना आखण्यात आली होती.
या योजनेनुसार, मार्गात येणाऱ्या एमआयडीसी क्षेत्रांनाही पाणीपुरवठा करण्याचा विचार होता. लोटे औद्योगिक क्षेत्राला सध्या पाव टीएमसी पाणी दिले जात असल्याचा उल्लेखही महाजन यांनी केला. औद्योगिक क्षेत्रांची गरज भागवून उर्वरित पाणी मुंबईला आणण्याची ही योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – गोकुळ संचालक नियुक्तीप्रकरणी सुनावणी ३ डिसेंबरला; सर्व १६ संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश!
‘कुणाचेही पाणी घेतले जात नाही’
या प्रकल्पावरून विरोधकांकडून व्यक्त होणाऱ्या शंकांबाबत महाजन म्हणाले की, हा जुना विषय असून त्याचा अभ्यास करून वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. सांगली किंवा सातारा जिल्ह्यातील पाणी घेतले जात नसून, वीज निर्मितीनंतर समुद्रात जाणारे पाणी वापरण्याचा विचार आहे. कोणाच्या हक्काचे पाणी वळविले जात नसल्याचा दावाही त्यांनी केला. विरोधकांना शंका असल्यास बैठक घेऊन संपूर्ण परिस्थिती समोर ठेवू, असे त्यांनी स्पष्ट केले.
जळगावच्या कुटुंबाच्या घटनेची माहिती घेणार
जळगाव जिल्ह्यातील एका कुटुंबाला सुरतमध्ये कालव्यात ढकलल्याच्या कथित घटनेबाबत विचारले असता, महाजन यांनी ही गंभीर घटना असल्याचे सांगितले. कामासाठी गेलेले कुटुंब बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली असून, एका मुलाने पोलिसांना घटनेची माहिती दिल्याचे समजल्याचे ते म्हणाले. या प्रकरणाची सविस्तर माहिती घेत असून, पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधत असल्याचे तसेच मुख्यमंत्र्यांच्या कानावरही हा विषय घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचा विजयाचा दावा
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत बोलताना महाजन यांनी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. १२ जागांवर बिनविरोध विजय मिळाल्याचा दावा करत, उर्वरित नऊ जागांवरही विजय मिळविण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीकडे उमेदवार आणि पॅनेल नसल्याची टीका करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.




