अंगणवाडी सेविका-मदतनीसांना ग्रॅच्युइटी देण्याबाबत शासन सकारात्मक; मंत्री आदिती तटकरे
‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ संकल्पनेतून पोषण अभियानाला बळ; मुंबईतील ८१७ अंगणवाड्या सक्षम होणार

मुंबई : पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून समाजातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचविण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचून सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना उपदान अर्थात ग्रॅच्युइटी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प योजनेअंतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ९व्या राष्ट्रीय पोषण माहाचा राज्यस्तरीय शुभारंभ आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यंदाचा पोषण माह ‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित आहे.
यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, सहआयुक्त संगिता लोंढे, विजय क्षीरसागर, आयुषचे सहायक संचालक सुश्रुत मुक्कावार यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
माता-बालकांच्या आरोग्यावर विशेष भर
पोषण माहाच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांच्या आहार व आरोग्याबाबत जनजागृती करण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे. यासाठी महिला व बालविकास, आरोग्य आणि आयुष विभागाने समन्वयाने काम करणे आवश्यक आहे, असे तटकरे यांनी सांगितले.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी जन्मापासूनच योग्य काळजी आणि शिशु अभ्यंगाचे महत्त्व मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष विभागाचा सहभाग घेण्यात आला आहे. आयुष विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीसांना आवश्यक मार्गदर्शन देण्यात येणार असून, ही माहिती मातांपर्यंत पोहोचविली जाणार आहे.
हेही वाचा – जालना जिल्ह्यात दोन वर्षांत ५०० शाळांचा दर्जेदार विकास; पंकजा मुंडेंचे निर्देश
डिजिटल अंगणवाड्यांमधून आरोग्य संदेश
‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून अंगणवाडी केंद्रे अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. डिजिटल अंगणवाड्यांमधील स्क्रीनवर आयुष विभागाने तयार केलेले आरोग्य व पोषणविषयक व्हिडीओ नियमितपणे दाखवावेत. त्यातील महत्त्वाची माहिती गरोदर आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचनाही मंत्री तटकरे यांनी दिल्या.
मुंबईतील ८१७ अंगणवाड्या होणार सक्षम
सक्षम अंगणवाडी प्रकल्पाअंतर्गत स्नेहा सामाजिक संस्था आणि एकात्मिक बालविकास सेवा यांच्यात करार करण्यात आला. या करारानुसार मुंबईतील ८१७ अंगणवाड्या आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज करून सक्षम करण्यासाठी काम केले जाणार आहे.
कार्यक्रमात आयुषच्या डॉ. शुभांगी ठाकूर यांनी बालकांचा मसाज आणि काळजी याबाबत सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. आरसीएचच्या डॉ. उपाली वाघमारे यांनी ‘ॲनिमिया’ विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी एकात्मिक बालविकास सेवेचा रंगीत लोगो, वेबपेज आणि ‘पोषण आहार प्रार्थने’चे उद्घाटनही करण्यात आले.
उत्कृष्ट जिल्ह्यांचा गौरव
गेल्या वर्षीच्या ८व्या राष्ट्रीय पोषण माहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वर्धा, हिंगोली आणि नागपूर जिल्हा कार्यालयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वर्धा, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यांचाही सन्मान करण्यात आला.
योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका ज्योती गायकवाड, शुभांगी लोहकर आणि कांता गायकवाड यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी प्रीशा धीवर, स्वामिनी कोलहाले आणि सुनीता मोगल या लाभार्थ्यांना योजनेच्या लाभाच्या रकमेचे धनादेश वितरित करण्यात आले.
दरम्यान, ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ आता डीबीटीच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.




