TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय; १३ ते १७ सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढणार

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात पावसाची शक्यता; १३-१४ सप्टेंबरला नाशिक-मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असतानाच आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा विदर्भातून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मार्गे कोकणाच्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्याने राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, विदर्भात ११ सप्टेंबरपासूनच पावसाला सुरुवात झाली असून, पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढू शकतो. १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासांत चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  BRICSमध्ये ‘दिल्ली जाहीरनामा 2026’ला एकमताने मंजुरी; जागतिक संस्थांमध्ये सुधारणांचा मोदींचा जोर

मराठवाड्यातही पावसाची शक्यता

विदर्भासोबतच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि लातूर या जिल्ह्यांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही दमदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नाशिक, मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज

कमी दाबाचा पट्टा विदर्भातून मराठवाड्याकडे आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातून कोकणाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे १३ आणि १४ सप्टेंबर रोजी नाशिक आणि मुंबई जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे डख यांनी सांगितले आहे.

राज्यात १२ ते १७ सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, या काळात राज्यातील वेगवेगळ्या भागांत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दीर्घकाळ पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

वरील पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केलेला आहे. स्थानिक परिस्थितीनुसार पावसाचे प्रमाण आणि वितरण बदलू शकते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button