UCMAS गणित स्पर्धेत पिंपरीतील अर्पिता छाजेडचे उज्ज्वल यश; राष्ट्रीय स्तरावर पटकावला ५ वा क्रमांक

UCMAS गणित स्पर्धेत पिंपरीतील अर्पिता छाजेडचे उज्ज्वल यश; राष्ट्रीय स्तरावर पटकावला ५ वा क्रमांक

​पिंपरी-चिंचवड:

आर. के. एल. इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता ६ वी (जॅस्मिन विभाग) मधील विद्यार्थिनी कु. अर्पिता नरेश छाजेड हिने प्रतिष्ठित ‘UCMAS’ मानसिक गणित स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत शाळेच्या आणि पिंपरी-चिंचवड परिसराच्या लौकिकात मोलाची भर घातली आहे. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत अवघ्या ८ मिनिटांत २०० गणिते अचूक सोडवून अर्पिताने आपल्या अफाट बौद्धिक क्षमतेची आणि मानसिक चपळतेची चुणूक दाखवून दिली.

​ राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उमटवला ठसा

​राज्यस्तरीय चॅम्पियन अवॉर्ड: २५ जानेवारी २०२६ रोजी बी.एम.सी.सी. कॉलेज, पुणे येथे पार पडलेल्या १९ व्या UCMAS पुणे राज्यस्तरीय स्पर्धेत अर्पिताने H-2 श्रेणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत थेट ‘चॅम्पियन अवॉर्ड’वर आपले नाव कोरले.नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ५ वा क्रमांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी सिडको कन्व्हेन्शन हॉल, वाशी (नवी मुंबई) येथे २५ वी UCMAS नॅशनल चॅम्पियनशिप
आयोजित करण्यात आली होती. देशभरातील २४ राज्यांतील तब्बल ८,००० हून अधिक विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत सहभाग होता. या कडक स्पर्धेत अर्पिताने l1 श्रेणीमध्ये संपूर्ण भारतात ५ वा क्रमांक (All India 5th Rank) मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले.

हेही वाचा –  मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा: संभाजी ब्रिगेड

​UCMAS मधील या उल्लेखनीय प्रवासात अर्पिताने उत्कृष्ट एकाग्रता, अचूकता आणि तीव्र स्मरणशक्तीचे प्रदर्शन केले आहे. तिने मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही गणितासारख्या विषयात अधिक मेहनत घेण्याची आणि प्रगती करण्याची मोठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तिच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक, नातेवाईक व परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

​”कु. अर्पिता छाजेड हिने अवघ्या ८ मिनिटांत २०० गणिते अचूक सोडवून UCMAS राष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेला ५ वा क्रमांक हा संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. तिची ही अफाट बुद्धिमत्ता, प्रचंड एकाग्रता आणि केलेली मेहनत खरोखर वाखाणण्याजोगी आहे. अर्पिताच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तिच्या या कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही अभ्यासात व स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची मोठी प्रेरणा मिळेल. शाळा परिवारातर्फे मी तिचे मनापासून कौतुक करतो आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी उदंड शुभेच्छा देतो.”

– डॉ . पुष्कर चौबे (सीईओ, आर. के. एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *