TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘सनदशीर मागण्या कशा मान्य करायच्या?’; मनोज जरांगेंच्या भूमिकेवर गिरीश महाजनांचा सवाल

‘१४ पैकी १२ मागण्या मान्य केल्या’; मुंबई आंदोलनाच्या इशाऱ्यावर महाजन म्हणाले, ‘आता त्यांनी थांबायला हवं’

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज १४वा दिवस असून, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देत काही मागण्या सनदशीर मार्गानेच मान्य होऊ शकतात, असे स्पष्ट केले.

“जरांगे पाटलांना वेळोवेळी आमच्या सरकारचे शिष्टमंडळ भेटायला गेले आहे. आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहोत. त्यांच्या १४ पैकी १२ मागण्या मान्यदेखील झाल्या आहेत. प्रत्येक वेळी ते उपोषणाला बसल्यानंतर आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जात पडताळणी समिती रद्द करा, यासारख्या सनदशीर नसलेल्या मागण्या कशा मान्य करायच्या?” असा सवाल गिरीश महाजन यांनी केला.

प्रत्येक वेळी वेगळी मागणी योग्य नाही’

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना महाजन यांनी मागण्यांनाही काही मर्यादा असायला हव्यात, असे म्हटले. “प्रत्येक वेळी वेगळी मागणी करणे योग्य नाही. कुठेतरी एकाच ठिकाणी अडून बसायचं, मला तरी हे योग्य वाटत नाही. सनदशीर मार्गानेच या सर्व प्रश्नांवर तोडगा निघेल,” असे महाजन म्हणाले.

यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांबाबतच्या वक्तव्यांवरही नाराजी व्यक्त केली. उच्चपदस्थ व्यक्तींविरोधात अशा प्रकारची भाषा वापरून प्रश्न सुटणार नाहीत, असे सांगत त्यांनी जरांगे पाटील यांनी आता थांबण्याचे आवाहन केले.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांच्या विकासाला गती; शिक्षण सभापती रविना आंघोळकर यांच्याकडून शाळांची प्रत्यक्ष पाहणी

मुंबई आंदोलनावर काय म्हणाले महाजन?

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या संभाव्य आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे महाजन यांनी सांगितले.

जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबतही महाजन यांनी चिंता व्यक्त केली. “त्यांच्या उपोषणाचा आज १४वा दिवस आहे. त्यांनी आता आपली तब्येत सांभाळली पाहिजे. एवढे दिवस उपोषण केल्याने त्याचा प्रकृतीवर परिणाम होतो,” असे गिरीश महाजन यांनी म्हटले.

मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता पुढील भूमिका काय घेतली जाते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button