दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पिकांच्या नुकसानीचे थेट शेतात जाऊन सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाची संयुक्त पाहणी; सर्वेक्षणानंतर नियमांनुसार नुकसानभरपाई देण्याचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि पावसाच्या दडीमुळे उभी पिके करपलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पिकांच्या नुकसानीचे प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना दिले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. ज्या भागांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्या भागांमध्ये अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
हेही वाचा – हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा गौरव; ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ने महाराष्ट्राचा मान उंचावला
या सर्वेक्षणासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाचे अधिकारी संयुक्तपणे काम करणार आहेत. पिकांचे नुकसान, बाधित क्षेत्र आणि नुकसानीची तीव्रता याची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केला जाणार आहे.
बळीराजाला नियमांनुसार आवश्यक ती नुकसानभरपाई देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. संपूर्ण सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित स्वरूपात किती मदत द्यायची, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे पावसाअभावी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.




