हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा गौरव; ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ने महाराष्ट्राचा मान उंचावला
मराठीत ‘नमस्कार, जय महाराष्ट्र’ने भाषणाची सुरुवात; महिला सक्षमीकरण, नागरिक-केंद्री प्रशासन आणि महाराष्ट्राच्या विकासाची मांडली भूमिका

लंडन : ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरव करण्यात आला. नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासनासाठी तसेच महिला सक्षमीकरण आणि जनहिताच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांना हा बहुमान देण्यात आला.
या ऐतिहासिक सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशी मराठीतून केली. त्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी सभागृह दुमदुमले. ब्रिटनच्या संसदेत मराठीतून भाषण करताना त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल आणि मातृभाषेचा अभिमान व्यक्त केला.
‘लाभले आम्हास भाग्य, जाणतो मराठी’ या सुरेश भटांच्या कवितेचा उल्लेख करत शिंदे यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्राची ओळख आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडली. आई आणि पत्नीच्या कष्टांतून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची आपली विचारसरणी घडल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याला सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
आपल्या भाषणात शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून महिलांच्या सक्षमीकरणाची आणि आर्थिक स्वावलंबनाची योजना बनली आहे, असे त्यांनी सांगितले. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातूनही लाखो नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
“केवळ रस्ते बांधणे म्हणजे विकास नाही, तर विकासाचा लाभ लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे,” असे सांगत शिंदे यांनी नागरिक-केंद्री प्रशासनावर भर दिला. त्यांच्या कार्यकाळातील जनहिताच्या योजनांची जागतिक स्तरावरील संस्थांनी दखल घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुंबई आणि लंडन ही दोन्ही महत्त्वाची आर्थिक केंद्रे असल्याचे सांगत महाराष्ट्र आणि ब्रिटनदरम्यान फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास या क्षेत्रांत सहकार्याची मोठी संधी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’च्या संकल्पनेचा उल्लेख करत महाराष्ट्राने विकासाची गती पकडल्याचेही त्यांनी सांगितले.
यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर बॅरोनेस आर्लेन फॉस्टर, यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक, उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांच्यासह ब्रिटिश संसद सदस्य, मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत, उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांना मिळालेला हा सन्मान महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा सन्मान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.




