अजितदादांचं काय झालं कोणालाच कळलं नाही, वेळीच शहाणे व्हा; मनोज जरांगेंचे खळबळजनक वक्तव्य

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १०वा दिवस आहे. प्रकृती खालावत असतानाही जरांगे यांनी आज महायुती सरकारवर अत्यंत तीव्र शब्दांत तोफ डागली. “देवेंद्र फडणवीस सरकार मोगलांपेक्षाही वाईट दिवस आणू शकतं. सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ‘ईडी’ लावून त्यांना उद्ध्वस्त केले जाते,” असा थेट आरोप करत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. तसेच सरकारचा माज उतरवण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी राज्यभरातील मराठा बांधवांना अंतरवली सराटीत एकत्र येण्याचे मोठे आवाहन केले.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, “आम्ही गरीब लोक आहोत, पण हे सरकार राजकीय लोकांच्या आणि मराठी व्यावसायिकांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावून, खोट्या केसेस दाखल करून त्यांना उद्ध्वस्त करत आहे; नाहीतर त्यांना स्वतःच्या पक्षात खेचत आहे. इतकी मग्रुरी आणि हुकूमशाही असेल तर अशा जिंदगीवर थुंकावंसं वाटतं. इतका मग्रूर शासक या राज्याला कधीही परवडणारा नाही. फडणवीसांच्या कारभारात एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचेही हाल सुरू आहेत. त्यामुळे समाजातील राजकीय आणि व्यावसायिक मराठ्यांनी वेळीच शहाणे होण्याची गरज आहे.”
हेही वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये मंत्र्यांना प्रवेश करू देणार नाही; सतीश काळे यांचा इशारा
यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचा भावनिक उल्लेख केला. “अजितदादांचं नेमकं काय झालं, हे अजूनही कोणाला समजलेलंच नाही. किती दिवस रिपोर्ट येणार, तपास सुरू आहे असंच सांगितलं जाणार? महाराष्ट्राचा एक सोन्यासारखा माणूस गेला. या सगळ्याकडे आता राजकारणाच्या पलीकडे जाऊन गंभीरपणे समजून घेण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले.
महायुतीसह महाविकास आघाडीवरही ताशेरे
आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही धारेवर धरले. “महायुती सरकार म्हणतं की शरद पवारांनी काय केलं? ठाकरेंनी आणि काँग्रेसने काय दिलं? मी महाविकास आघाडीची बाजू घेत नाही, त्यांनीही मराठ्यांचं वाटोळंच केलं आणि काहीच दिलं नाही. पण महायुती सरकारने तर आरक्षण देण्याचं नाटक करून मराठ्यांना पुन्हा रस्त्यावर आणून उघडं पाडलं,” असा हल्लाबोल त्यांनी केला. १२ सप्टेंबर रोजी अंतरवलीत होणाऱ्या महाबैठकीत आंदोलनाची पुढील निर्णायक दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.





