गोकुळाष्टमीच्या जल्लोषात ‘सायबर वॉरियर्स’कडून सायबर सुरक्षेचा जागर!
नृत्य, नाटिका आणि शेरोशायरीतून नागरिकांना डिजिटल दक्षतेचा संदेश; उपस्थितांनी घेतली सायबर जागरूकतेची प्रतिज्ञा

डोंबिवली : गोकुळाष्टमीच्या उत्साहपूर्ण वातावरणात नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचा संदेश देण्यासाठी ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगती महाविद्यालयातील ‘क्विक हिल सायबर वॉरियर्स’च्या वतीने विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्यप्रस्तुती आणि जनजागृतीपर नाटिकेच्या माध्यमातून वाढत्या सायबर गुन्ह्यांचे वास्तव प्रभावीपणे मांडले. फोटो मॉर्फिंग, बनावट ई-मेल, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) आधारे होणारी फसवणूक तसेच संशयास्पद लिंकद्वारे नागरिकांची केली जाणारी आर्थिक व वैयक्तिक माहितीची फसवणूक यांसारख्या प्रकारांवर प्रकाश टाकण्यात आला.
सायबर गुन्हेगारांकडून वापरण्यात येणाऱ्या विविध युक्त्या विद्यार्थ्यांनी नाटिकेतून उलगडून दाखविल्या. अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, ओटीपी व बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही न देणे, बनावट ई-मेल आणि संदेशांची खातरजमा करणे, मजबूत पासवर्डचा वापर करणे तसेच ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना विशेष सतर्कता बाळगणे, अशा महत्त्वपूर्ण सूचना नागरिकांना देण्यात आल्या. शेरोशायरीच्या माध्यमातून दिलेला सायबर सुरक्षेचा संदेशही उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.
हेही वाचा – ‘कायदा-सुव्यवस्था बिघडली तर फडणवीस जबाबदार’; जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघाती हल्लाबोल
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक तथा कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे आणि प्रगती महाविद्यालयाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांनी ‘सायबर जागरूकता प्रतिज्ञा’ घेत सुरक्षित व जबाबदार डिजिटल व्यवहार करण्याचा संकल्प केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय वानखडे आणि आयटी विभागप्रमुख रूपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गुरुनाथ पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, सहसंचालक अजय शिर्के, गायत्री केसकर आणि दिपू सिंग यांनीही उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. सण-उत्सवाच्या आनंदाला सामाजिक जनजागृतीची जोड देत विद्यार्थ्यांनी राबविलेला हा अभिनव उपक्रम नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी सजगता आणि डिजिटल दक्षता निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.




