“चोरांना चोरीचा माल वापरू देऊ नका, धनुष्यबाण चिन्ह गोठवा”; उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई | शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “निकाल येण्यास उशीर होत असेल, तर तोपर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह तातडीने गोठवून टाका. आमचा पक्ष, नाव आणि चिन्ह ज्यांनी चोरले, त्या चोरांना हा चोरीचा माल वापरू देऊ नका,” अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात मांडलेल्या भूमिकेचे त्यांनी पूर्ण समर्थन केले.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढताना ठाकरे म्हणाले की, “आम्हाला आमचे नाव आणि चिन्ह मिळण्यासाठी न्यायालयात केस उभी राहण्याची गरजच नव्हती. आयोग आमची घटना तपासत बसला आहे. पण नरोडामध्ये पत्ते असणारे जे सहा बोगस राजकीय पक्ष समोर आले, ज्यांच्याकडे ६२० कोटींची संपत्ती आहे, त्यांची घटना आयोग तपासणार आहे का? मग या देणग्यांमध्ये निवडणूक आयोगही भागीदार आहे असे आम्ही समजायचे का?”
हेही वाचा
साडीत कंबर दिसते, यात अश्लीलता काय? पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राधा पाटीलचा संताप
चिन्ह गोठवणे म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवणे, या एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, “शिंदे हे स्वतःच गोठलेल्या मनाचे आहेत. त्यांना गोठ्यात न्या, असा सल्लाही मी देणार नाही; कारण गोठ्यातील जनावरे तरी माणसाच्या उपयोगी पडतात. पक्ष आणि चिन्ह चोरणाऱ्या अशा गोठलेल्या मनाच्या चोरांना धनुष्यबाणावर बोलण्याचा कसलाही नैतिक अधिकार नाही.”
उत्सवातील गोंगाट आणि डीजेला विरोध
यावेळी सण-उत्सवांबाबत बोलताना त्यांनी डीजेबंदीच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दिला. “प्रत्येकाला सण-उत्सव उत्साहात साजरे करायचे आहेत, पण कोणालाही कानठळ्या बसवणारा गोंगाट नको आहे. तसेच महापुरुषांच्या बरोबरीने पंतप्रधानांचे फोटो लावण्याचे अजिबात समर्थन करता येणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.




