“डीजे-डॉल्बी फेकून द्या, दहीहंडीत नृत्यांगना नाचवणारे देशद्रोही”; संभाजी भिडे यांचं वक्तव्य

पुणे | राज्यात सण-उत्सवांमधील डीजे, डॉल्बीचा वाढता दणदणाट आणि दहीहंडी उत्सवातील नृत्यांगनांच्या नृत्यावरून वाद पेटलेला असतानाच, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “डीजे आणि डॉल्बी हे फेकूनच दिले पाहिजेत. उत्सवात डीजे वाजवणे हा शुद्ध मूर्खपणा असून, दहीहंडीत नृत्यांगना नाचवणारे देशद्रोही आहेत,” असा घणाघात संभाजी भिडे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
सण-उत्सवांत लावले जाणारे डीजे आणि लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर बोलताना भिडे म्हणाले, “डीजे आणि डॉल्बीचा नक्की उपयोग काय आहे? त्यामधून देशाला काय मिळते? डीजे आणि डॉल्बी वाजवणे मला केवळ मूर्खपणा वाटतो. समाजातील सगळ्या काळ्या शक्ती गाडण्यासाठी आपल्याला काही वाईट गोष्टी ठामपणे नाकाराव्याच लागतील; त्यामध्ये डीजे आणि डॉल्बीचा समावेश आहे. त्यामुळे ते फेकून दिले पाहिजेत.”
हेही वाचा
“चोरांना चोरीचा माल वापरू देऊ नका, धनुष्यबाण चिन्ह गोठवा”; उद्धव ठाकरेंची मागणी
“आपले असले तरी ते देशद्रोहीच”
दहीहंडीच्या मंचावर अश्लील हावभाव करत नृत्यांगना नाचवण्याच्या प्रकारांवर विचारले असता त्यांनी कडक शब्दांत फटकारले. “तो अतिशय मूर्खपणा आहे. दहीहंडीच्या पवित्र सणात नृत्यांगना नाचवणारे लोक देशद्रोही आहेत. अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार करणारे मग ते आपले कोणीही असले तरी ते देशद्रोहीच आहेत,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. पुण्यातून सुरू झालेल्या डीजेबंदीच्या मोहिमेला आता संभाजी भिडे यांच्या वक्तव्याने आणखी बळ मिळाले आहे.





