टेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड गुन्हेवृत्त: पोलीस आयुक्तालय हद्दीत २४ तासांत सात गुन्ह्यांची नोंद

फसवणूक, मारहाण, अपघात, चोरी, अंमली पदार्थ अन् शस्त्रबंदी भंग 

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी  : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री १२ ते रात्री १२ या चोवीस तासांत विविध पोलीस ठाण्यांत सात गुन्हे दाखल झाले असून, यात ग्राहकांची आर्थिक फसवणूक, मित्राकडूनच मारहाण, अनोळखी अॅम्ब्युलन्सची धडक, म्हैस चोरी, बालिकेचा त्याग, अफूचूर्ण जप्ती आणि शस्त्रबंदी आदेशाचा भंग अशा घटनांचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.


१. २.९१ लाखांची अफरातफर : सेल्स एक्झिक्युटिव्हने ग्राहकांचे पैसे लाटले

देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किवळे येथील सम्राट ऑटोमोबाईलच्या आऊटलेटमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या किशोर सुधाकर बागडे (वय ४१, रा. संगमवाडी, शिवाजीनगर) याने डिसेंबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत ग्राहकांकडून वाहन बुकिंगपोटी रोख व ऑनलाइन पद्धतीने स्वीकारलेले तब्बल २ लाख ९१ हजार ८०० रुपये कंपनीच्या खात्यावर जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याची तक्रार सेल्स मॅनेजर महिलेने (वय ५५) दिली. भारतीय न्याय संहितेच्या फसवणूकविषयक कलमांखाली गुन्हा दाखल.

२. कामावरून वाद विकोपाला : मित्रानेच केली दांडक्याने मारहाण

निगडी येथील शिवराजे बिल्डिंगसमोर, अजंठानगर, चिंचवड परिसरात दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री कामाच्या कारणावरून वाद होऊन मित्रानेच सागर भारत गायकवाड (वय २६) यांना शिवीगाळ करत मारहाण केली. दुसऱ्या आरोपीने अॅक्टिवा गाडीतून लाकडी दांडका काढून तो पहिल्या आरोपीला दिला, ज्याने पायांवर व गुडघ्यावर वार करून जखमी केले.

३. सायकलस्वाराला अनोळखी अॅम्ब्युलन्सची धडक, पाय फ्रॅक्चर

चिखली येथील जाधव सरकार चौक, स्पाईन रोड परिसरात दि. ६ सप्टेंबर रोजी पहाटे कामावर सायकलने जात असलेल्या लक्ष्मण साह (वय ५६, मूळ रा. बिहार) यांना बेदरकारपणे चालवलेल्या अनोळखी अॅम्ब्युलन्सने धडक दिली. अपघातात त्यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली. चालक फरार.

४. गोठ्यातून साठ हजारांची म्हैस लंपास

तळेगाव एमआयडीसी हद्दीतील सुदुंबरे, मावळ येथे दि. ६-७ सप्टेंबरच्या रात्री संजय बबनगाडे (वय ५६) यांच्या गोठ्यातील ६० हजार रुपये किमतीची नवीन घेतलेली मुऱ्हा जातीची म्हैस अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

५. काळजाला घरे पाडणारी घटना : दीड-दोन वर्षांच्या चिमुरडीचा त्याग

सुदवडी, मावळ येथील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी अज्ञात पालकांनी दीड ते दोन वर्षे वयाच्या बालिकेला वाऱ्यावर सोडून तिचा त्याग केल्याची घटना घडली. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली असून बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल.

६. दुचाकीस्वाराकडे ८८७ ग्रॅम अफूचूर्ण जप्त, राजस्थानी तरुण अटकेत

वाकड येथील डांगे चौक ते रावेत मार्गावर एच.पी. पेट्रोल पंपासमोर दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने रेवतराम चौधरी (वय २५, रा. राजस्थान) यास हिरो होंडा दुचाकीसह अडवले असता त्याच्याकडे १३ हजार ३०५ रुपये किमतीची ८८७ ग्रॅम अफूचूर्ण (पॉपी स्ट्रॉ) आढळून आले. एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, आरोपी अटक.

७. मनाई आदेश झुगारला : तलवार-कोयत्यासह तरुण ताब्यात, तिघांवर गुन्हा

पिंपरी येथील हनुमान मंदिर, विद्यानगर परिसरात दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने प्रेम कृष्णा मोरे (वय १९, रा. निगडी प्राधिकरण) यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून धारदार लोखंडी तलवार व कोयता असा एकूण १,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्तांनी शस्त्रे बाळगण्यास घातलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तसेच सहआरोपी रोहन माने व रिहान शेख यांनी शस्त्रे पुरवल्याप्रकरणी शस्त्र अधिनियम व मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button