पिंपरी-चिंचवडमध्ये मंत्र्यांना प्रवेश करू देणार नाही; सतीश काळे यांचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची शासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी

पिंपरी- चिंचवड | मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा दहावा दिवस उलटूनही राज्य शासनाने अपेक्षित गांभीर्य दाखवलेले नाही. सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या मंत्र्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रवेश करण्यापासून रोखण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश काळे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची शासनाकडून अद्याप गंभीर दखल घेतली जात नसल्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत तातडीने चर्चा करून सकारात्मक निर्णय घ्यावा आणि त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी काळे यांनी केली.
“उपोषणाचा दहावा दिवस उलटूनही सरकारकडून अपेक्षित संवेदनशीलता आणि गांभीर्य दाखवले जात नाही. मराठा समाजाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत राहिल्यास त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटतील. सरकारने परिस्थिती आणखी चिघळण्याची वाट न पाहता तातडीने तोडगा काढावा,” असे काळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा
धनगर एसटी आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करा!
मराठा समाज शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करीत आहे. मात्र शासनाने या संयमाचा अंत पाहू नये. आंदोलनाची तीव्रता, उपोषणकर्त्यांची प्रकृती आणि समाजाच्या भावना लक्षात घेऊन सरकारने तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही काळे यांनी स्पष्ट केले.
“सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर पिंपरी-चिंचवडमध्ये येणाऱ्या कोणत्याही मंत्र्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून रोखले जाईल. त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची असेल,” असा स्पष्ट इशाराही सतीश काळे यांनी दिला.
मराठा समाजाच्या संयमाची आणखी परीक्षा न घेता शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची आणि समाजाच्या भावनांची गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच चर्चेच्या माध्यमातून मागण्यांवर तातडीने ठोस व सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी काळे यांनी केली आहे.
“मराठा समाजाच्या संयमाची सरकारने परीक्षा घेऊ नये. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या कोणत्याही मंत्र्याला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रवेश करू दिला जाणार नाही. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची असेल.”
– सतीश काळे, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा.




