“नेपाळशिवाय आमचे प्रभू राम अपूर्ण आहेत”; पंतप्रधान मोदींचे भाष्य, अयोध्या-जनकपूर रेल्वेला हिरवा झेंडा

नवी दिल्ली | नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेला तणाव निवळण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान बालेन शाह यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडल्यानंतर अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच, रामनगरी अयोध्या ते सीतामातेची जन्मभूमी जनकपूर या दरम्यान धावणाऱ्या ‘सरयू-कमला एक्सप्रेस’ रेल्वे सेवेला दोन्ही नेत्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या पुरात प्राण गमावलेल्या नागरिकांप्रति शोक व्यक्त करत नेपाळसाठी २४ हजार कोटी नेपाळी रुपयांचे विकास पॅकेज जाहीर केले; याशिवाय सीमाभागातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी उत्तराखंड आणि नेपाळ दरम्यान धारचुला येथे एका महत्त्वाच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच बनबासा येथे ‘इंटिग्रेटेड चेक पोस्ट’ची (एकात्मिक तपासणी नाका) पायाभरणी करत नेपाळमधील दोधारा चांदनी येथील इंटिग्रेटेड चेक पोस्टच्या विकासालाही गती देण्याचा आणि नेपाळ व भारतातील बिहार, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांदरम्यान रस्ते, रेल्वे व सीमा कनेक्टिव्हिटी प्रकल्पांना नव्याने चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा
कच्च्या तेलाच्या दरवाढीचा भारताला मोठा फटका; आयात बिल ६० टक्क्यांनी वाढले!
यावेळी पंतप्रधान मोदींनी नेपाळचे तरुण पंतप्रधान बालेन शाह यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. संयुक्त राष्ट्रांसमोर (UN) जगातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून बालेन शाह यांनी मांडलेल्या विचारांचा मोदींनी विशेष उल्लेख केला. तसेच २०१८ मधील आपल्या जनकपूर भेटीची आठवण सांगताना मोदी म्हणाले की, “प्रभू राम आणि माता सीता हे भारत आणि नेपाळच्या सामायिक संस्कृतीचे व श्रद्धेचे प्रतीक आहेत. नेपाळशिवाय आमचे धाम अपूर्ण आहेत आणि नेपाळशिवाय आमचे प्रभू रामही अपूर्ण आहेत. ‘सरयू-कमला एक्सप्रेस’मुळे अयोध्येला येणाऱ्या भाविकांना जनकपूरपर्यंत प्रवास करणे अधिक सुलभ होईल.”
पंतप्रधान बालेन शाह काय म्हणाले?
द्विपक्षीय चर्चेनंतर बोलताना नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारत-नेपाळ संबंधांच्या भविष्याबाबत विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, “आम्ही शतकानुशतके जुने ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सविस्तर चर्चा केली असून विविध क्षेत्रांत महत्त्वाचे करार झाले आहेत. या प्रकल्पांमुळे आमच्या शेतकऱ्यांच्या शेतात समृद्धी येईल, तरुणांच्या हातात रोजगार आणि विद्यार्थ्यांना नवी क्षितिजे मिळतील. तसेच उद्योजकांसाठी नवीन बाजारपेठा आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण होऊन भारत-नेपाळ संबंध एका नवीन उंचीवर पोहोचतील.”




