“संजय दत्त मराठी येत नाही म्हटल्यावर हसता, रिक्षावाल्यांना दमदाटी करता”; भाजप आमदाराची मंत्री सरनाईकांवर टीका

मुंबई | दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने ठाण्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून जोरदार राजकीय कलगीतुरा रंगला आहे. अभिनेता सुनील शेट्टीने शिवसेना नेते रवींद्र फाटक यांच्या दहीहंडीत अस्खलित मराठीत संवाद साधून उपस्थितांची मने जिंकली असतानाच, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडी मंचावर अभिनेता संजय दत्तने “मी ६ वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात राहिलो, तरीही मराठी शिकू शकलो नाही,” असे जाहीरपणे वक्तव्य केले. संजय दत्तच्या या वक्तव्यावर मंत्री सरनाईक केवळ हसत राहिल्याने भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे.
रविवारी दहीहंडी उत्सवानिमित्त प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीला अभिनेता संजय दत्तने भेट दिली. यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले, “आमच्या दहीहंडीला अभिनेता सुनील शेट्टी, क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव येऊन गेला. सर्वांना आम्ही मराठीत संवाद करण्याचा आग्रह केला. सध्या मी सर्वांना मराठी शिकवत आहे. त्यामुळे संजय दत्तही आधी आपल्याशी मराठीतून थोडे बोलतील आणि नंतर हिंदीत बोलतील.” प्रताप सरनाईक यांच्या विनंतीनंतर संजय दत्त सुरुवातीला, ‘तुम्हा सर्वांना नमस्कार’, हे वाक्य मराठीत म्हणाला. त्यानंतर त्याने सांगितले, “प्रतापभाई, मी सहा वर्ष पुण्याच्या येरवडा तुरुंगात राहिलो. तेव्हाही मराठी शिकू शकलो नाही.” यानंतर प्रताप सरनाईक हे स्मितहास्य करतात.
हेही वाचा
अजितदादांचं काय झालं कोणालाच कळलं नाही, वेळीच शहाणे व्हा; मनोज जरांगेंचे खळबळजनक वक्तव्य
ठाण्यातील भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी या प्रकारावरून प्रताप सरनाईक यांना लक्ष्य केले. “एखादा सिनेकलाकार मला मराठी येत नाही, हे तुमच्याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सांगतो. तेव्हा तुम्ही त्यावर हसता. पण जेव्हा सामान्य रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येत नाही म्हटले तर त्याला तुम्ही दमदाटी करता. हा कुठला न्याय आहे. तुमच्या व्यासपीठावर अभिनेता मराठी येत नाही म्हटल्यावर त्याला तुम्ही टोकतही नाही. प्रताप सरनाईक यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे.”
संजय राऊत यांचीही टीका
संजय राऊत यांनाही याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. “प्रताप सरनाईक यांनी रिक्षावाल्यांना मराठी यायला पाहिजे, म्हणून कठोर कारवाईचे आदेश दिले होते. पण अमित शाहांनी ते मोडून काढले. यांचा सगळा कारभारच हास्यास्पद आहे. सरनाईक यांनी संजय दत्तला तिथेच थांबवायला हवे होते. तुम्ही महाराष्ट्रात राहत असून ठाण्यात उभे आहात, हे सांगायला हवे होते. पण हे ढोंगी लोक आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.





