‘हे पाप 1994 साली झालं’; मराठा आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर निशाणा
‘मराठा आरक्षणाला देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गती’; कुणबी प्रमाणपत्रासाठी 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. 1994 मध्ये मंडल आयोगाच्या वेळी मराठा समाजाचा OBC प्रवर्गात समावेश केला असता, तर आजचा इतिहास घडला नसता. 1994 साली मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीचे हे पाप आहे, असा टोला विखे पाटील यांनी लगावला. यापूर्वीही विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पवारांच्या भूमिकेवर टीका केली आहे.
येत्या 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या सात दिवसांच्या कालावधीत राज्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या नागरिकांच्या अर्जांवर कार्यवाही करण्यात येईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.
‘आम्ही सकारात्मक आहोत, कुणालाही फसवत नाही’
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक असून आंदोलकांनीही दोन पावले पुढे यावे, असे आवाहन विखे पाटील यांनी केले. ‘आम्ही दोन पावले पुढे येत आहोत, आंदोलकांनीही पुढे यावे. सुधारणा करायच्या असतील तर सांगा, समिती चर्चेसाठी तयार आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला गती मिळाली असल्याचा दावा विखे पाटील यांनी केला. सरकारचा मसुदा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – MPSC Paper Leak : औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; ऋतुजा पाटीलला ३ दिवसांची पोलीस कोठडी
‘58 मोर्चांचा आदर करत गायकवाड आयोगाची स्थापना’
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात 58 मोर्चे निघाले. या आंदोलनांचा आदर करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड आयोगाची स्थापना केली आणि त्यानंतर 16 टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात हे आरक्षण रद्द झाले, असा दावा विखे पाटील यांनी केला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठा विद्यार्थ्यांना OBC विद्यार्थ्यांप्रमाणे सुविधा
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC विद्यार्थ्यांप्रमाणे विविध सुविधा देण्यात येत असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांचे दाखले नाकारले गेले आहेत, त्यांच्या शिक्षणाची फी EWS अंतर्गत भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजासाठी सवलती लागू करण्यात आल्या असून SARTHIच्या माध्यमातून आठ वसतिगृहे बांधण्यात आली आहेत. प्रत्येक वसतिगृहाची क्षमता एक हजार विद्यार्थ्यांची आहे. आता तालुकानिहाय वसतिगृहे उभारण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.





