Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

MPSC Paper Leak : औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; ऋतुजा पाटीलला ३ दिवसांची पोलीस कोठडी

लॅपटॉपमधील २९४ प्रश्न आणि पर्यायांची नोंद असल्याचा पोलिसांचा दावा; उर्वरित आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई : नीट पेपरफुटीनंतर राज्यभर चर्चेत आलेल्या MPSC परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील तपासाला वेग आला आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी गुन्हे शाखेने यापूर्वी तीन अधिकाऱ्यांसह सात जणांना अटक केली होती. त्यानंतर नंदुरबार येथून ऋतुजा पाटील हिलाही पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर ऋतुजाला तीन दिवसांची, तर इतर आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणातील सर्व आरोपींना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. आरोपींची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. आरोपी तपासात सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा दावाही पोलिसांनी केला.

या प्रकरणातील आरोपी MPSC अधिकारी विश्वेश्वर नकाते याने गुन्ह्यात वापरलेला लॅपटॉप खाडीत फेकल्याची माहिती तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने लॅपटॉप फेकण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

याच लॅपटॉपमध्ये परीक्षेत विचारले जाणारे २९४ प्रश्न आणि त्यांचे पर्याय नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी खाडीतून हा लॅपटॉप शोधून काढला असून, त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा –  ‘भाजपचे नेते अमृत महोत्सवाला आले नाहीत, याचे दुःख’; एकनाथ खडसे

नंदुरबारमधील कौटिल्या क्लासेसचे संचालक आणि आरोपी प्रवीण पाटील यांच्या घरातून आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे सापडल्याची माहितीही पोलिसांनी न्यायालयात दिली. या कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

पेपरफुटी प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि इतर आरोपींची भूमिका तपासण्यासाठी आणखी चौकशी आवश्यक असल्याने पोलिसांनी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ऋतुजा पाटीलला तीन दिवसांची आणि उर्वरित आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

कुठला प्रश्न परीक्षेत येणार, हे माहीत नव्हते

आरोपींच्या वतीने बाजू मांडताना वकील सत्यराम गौड यांनी पोलिसांच्या सात दिवसांच्या कोठडीच्या मागणीला विरोध केला. विश्वेश्वर नकाते यांचा लॅपटॉप नष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परीक्षेत नेमका कोणता प्रश्न विचारला जाणार आहे, याची आरोपींना माहिती नव्हती, असा युक्तिवाद त्यांनी केला.

ऋतुजाला प्रश्नसंच MPSCचा असल्याचे माहीत नव्हते

ऋतुजा पाटीलने गौरवला प्रश्नसंच पाठवला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मात्र, हा प्रश्नसंच MPSCच्या परीक्षेचा असल्याची माहिती ऋतुजाला नव्हती, असा युक्तिवाद गौरवच्या वकिलांनी न्यायालयात केला.

प्रश्नसंच २० तारखेला गौरवला मिळाला होता, असा दावाही बचाव पक्षाकडून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींची भूमिका आणि प्रश्नसंच नेमका कुठून लीक झाला, याचा तपास सध्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button