पुण्यात गणेशोत्सवात DJ, लेझरवर प्रशासनाची करडी नजर; नियम मोडल्यास थेट गुन्हा
ध्वनी प्रदूषणाबाबत न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; वाढत्या ध्वनी प्रदूषणाविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार

पुणे : देशभरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असताना पुण्यातील पारंपरिक आणि सांस्कृतिक गणेशोत्सवासाठी गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. मात्र, यंदाही उत्सवातील डीजे, ध्वनीक्षेपक, लेझर लाईट आणि ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. गणेशोत्सव काळात न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिला आहे.
पुण्यातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी आवाज उठवला आहे. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत त्यांनी ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या पार्श्वभूमीवर पुण्यात ध्वनी प्रदूषणाविरोधातील चर्चेला पुन्हा वेग आला आहे.
लेझरवर बंदी कायम राहणार
गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात लेझर लाईटवरील बंदी कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले. तसेच ध्वनी प्रदूषणाबाबत न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गणेश मंडळांसाठी बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून गणेश मंडळांच्या बैठका घेण्यात आल्या असून, त्यांना नियम आणि न्यायालयाच्या आदेशांबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे उत्सवादरम्यान डीजे आणि ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत निर्धारित नियमांचे पालन करावे, असे आवाहन डूडी यांनी केले.
हेही वाचा – MPSC Paper Leak : औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; ऋतुजा पाटीलला ३ दिवसांची पोलीस कोठडी
नियम मोडल्यास गुन्हा दाखल
ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असल्याने उत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
ध्वनी प्रदूषणाविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार
दरम्यान, पुण्यातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचला आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील रहिवासी शरद केळकर यांनी पुण्यातील ध्वनी प्रदूषणाबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न आता अधिक गांभीर्याने चर्चेत आला आहे.
दरम्यान, डीजे आणि कर्णकर्कश ध्वनीमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रशासन, गणेश मंडळे आणि नागरिकांनी समन्वयाने नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.





