‘भाजपचे नेते अमृत महोत्सवाला आले नाहीत, याचे दुःख’; एकनाथ खडसे
‘भाजपमध्ये आज ८० टक्के लोक अन्य पक्षातून आले’; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने मदतीसाठी पुढे यावे, खडसेंचे आवाहन

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. मात्र, भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत खडसे यांनी व्यक्त केली. भाजपमध्ये तब्बल ४० वर्षे काम केल्याने अनेक नेत्यांशी आजही आपले घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती; मात्र ते येऊ शकले नाहीत, याचे दुःख असल्याचे खडसे म्हणाले.
‘भाजप वाढवण्यासाठी आम्ही घेतलेली मेहनत त्यांना माहीत नाही’
अमृत महोत्सवानिमित्त सर्व पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यापैकी अनेक नेते कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मात्र, भाजपमधील अनेक नेते येऊ शकले नाहीत, असे खडसे यांनी सांगितले.
‘भाजपमध्ये सध्या ८० टक्के लोक अन्य पक्षांतून आले आहेत. त्यातील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी भाजप वाढवण्यासाठी किती मेहनत घेतली, हे त्यांना माहीत नाही,’ अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.
‘दोन दिवसांत मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व’
गेल्या अनेक वर्षांपासून गरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याचा प्रयत्न केला असून, यापुढेही समाजसेवेचा हा वसा कायम ठेवणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.
अमृत महोत्सवानिमित्त गेल्या दोन दिवसांत मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली. एवढी गर्दी आपण यापूर्वी कोणत्याही सभा किंवा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पाहिली नव्हती, असा दावा खडसे यांनी केला. मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले.
हेही वाचा – पावसाळा-थंडीत मोहरीच्या तेलाचा वापर फायदेशीर? जाणून घ्या संभाव्य फायदे
पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना मदत करा
राज्यातील काही भागांत अद्याप पुरेसा पाऊस झालेला नसल्याने शेतकरी अडचणीत असल्याचेही खडसे यांनी सांगितले. या आठवड्यात पावसाचा अंदाज आहे. पाऊस झाला तर आनंदाची बाब असेल; मात्र पाऊस न झाल्यास सरकारने अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे यावे, अशी मागणी त्यांनी केली.
पावसाअभावी काही शेतकरी शेती नांगरून टाकण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना आवश्यक मदत करावी, असे खडसे म्हणाले.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही भाष्य
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असून, सरकार आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.





