उच्च शिक्षणाकडून उज्ज्वल भविष्याकडे

पिंपरी- चिंचवड : नवी स्वप्ने, नव्या आशा मनाशी बाळगून आता आपण वाट पाहत आहोत ती महाविद्यालयाच्या प्रवेशाची. पालक आणि विद्यार्थी सर्वांना वेध लागले आहेत ते महाविद्यालय निवडीचे. मला असे आवर्जून इथे सांगावेसे वाटते की जसे आपण कोणते महाविद्यालय निवडायचे ते तेथे उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधा, शैक्षणिक गुणवत्त्ता, व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी यावर ठरवितो तसेच या सर्वांचा वापर स्वतःसाठी कसा करून घ्यावयाचा याचाही विचार करायला हवा.
आजपर्यंत फक्त गुणवत्तेभोवती फिरणाऱ्या आपल्या मनाला काहीतरी नवीन करण्याची ओढ लागलेली असते आणि सुरू होतो एक नवा प्रवास म्हणजेच शोध नविन्याचा. नवे आकाश, नवे पंख, आणि नव्या उत्साहाने भरून गेलेली तरुण मने शोधू लागतात नव्या वाटा ज्या त्यांच्या मधील सुप्त कलागुणांना वाव देतील.युवा विद्यार्थी’ हे संबोधन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वापरले जाते. स्वामी विवेकानंदांच्या मते युवक हे असामान्य ऊर्जेचे प्रतीक आहेत ज्यांच्यामध्ये परिवर्तनाची अमर्याद शक्ती असते ज्याद्वारे ते उज्ज्वल भविष्यातील निर्मिती करतात. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना युवक म्हणजे देशाची मोठी ताकद वाटते. महात्मा गांधींच्या मते चारित्र्यवान युवक देशाच्या प्रगतीमध्ये अमूल्य असे योगदान देतात. महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक ज्ञानाबरोबरच आत्मसन्मान, आत्मविश्वास, विचारशक्ती, सामाजिक जाणीव, संवेदनशीलता विकसित करण्याची संधी उपलब्ध करून देते.
एनईपी २०२० मुळे विद्यार्थ्यांना मुख्य विषयाबरोबरच इतर शाखेतील विषय उपविषय म्हणून घेता येतात. याचा फायदा असा आहे की त्यांना केवळ एकाच विषयाचे ज्ञान न राहता इतर विषयांचेही ज्ञान प्राप्त होते. विविध विषयांची माहिती मिळते. यालाच आपण ‘बहुविद्याशाखीय शिक्षणाची संधी’ म्हणून पाहतो. तसेच, बहुविध कौशल्ये विकसित करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतात.
उच्च शिक्षण घेत असताना स्थानिक ते वैश्विक हा प्रवास करण्याची संधी अनेक महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे. या संधीचा उपयोग करून विद्यार्थी परदेशी विद्यापीठांना, उद्योग क्षेत्राला भेट देऊ शकतात. अशा भेटींमधून शैक्षणिक, सांस्कृतिक, संशोधनात्मक विचारांचे आदान – प्रदान होते. विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, नेतृत्व क्षमता, सहकार्य अशा गुणांचा विकास होतो. परदेशी कार्यसंस्कृतीची ओळख होते.
हेही वाचा – चेंबूरच्या प्रसिद्ध ‘अशफाक बेकरी’वर FDAचा बडगा; FSSAI परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव

उच्च शिक्षण हा मानवी जीवनातील सुवर्ण काळ मानला जातो. इथे विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. उच्च शिक्षण हे एक असे व्यासपीठ आहे जिथे कलागुण सादर करता येतात, तज्ज्ञ आणि अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मिळते, सामाजिक प्रकल्पांमध्ये सहभागी होता येते, नवीन कल्पनांचे सादरीकरण करता येते, संशोधनात्मक विचारांना पाठबळ मिळते, कार्यक्रमाचे नियोजन ते अंमलबजावणीपर्यंतचा अनुभव घेता येतो. थोडक्यात सांगायचे तर विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यासाठी उच्च शिक्षण हा एक सर्वोत्तम काळ आहे. बदलती जीवनशैली, आव्हाने, स्पर्धा या सर्वांचा ताण विद्यार्थ्यांच्या मनावर येत असतो. त्यांची भावनिक आणि मानसिक शक्ती वाढवण्यासाठी सकारात्मक विचारांची, आत्मविश्वासाची गरज असते. विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणामधील सक्रिय सहभाग हा त्यांना एक सक्षम आणि परिपूर्ण व्यक्तिमत्त्व बनविण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतो.
यामध्ये पालकांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. जागरूक, संवेदनशील, वास्तववादी आणि अभ्यासू दृष्टिकोनातून विचार करून आपल्या पाल्याला आवडेल अशा क्षेत्राची निवड करण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलाची किंवा मुलीची क्षमता, त्यांच्या करिअरबाबतचे विचार, भविष्यासाठी त्यांनी आखलेले नियोजन आणि एकंदरीत त्यांचा दृष्टिकोन याविषयी मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे. परस्परांमधील मतभेद वादविवादाने सोडविण्याऐवजी समंजसपणे आणि संवादाच्या माध्यमातून सोडविण्यावर भर दिला पाहिजे. आपल्या मुला-मुलीचे उज्ज्वल भविष्य हे त्यांच्या आवडी, क्षमतांचा योग्य सन्मान आणि सर्वांच्या सहकार्याने आनंदाने घडले पाहिजे.
सर्व तरुण वर्गाला मला आवर्जून असे सांगावेसे वाटते की, उच्च शिक्षण म्हणजे केवळ एक पदवी प्राप्त करण्याचा प्रवास नसून, उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी करण्याची सुवर्णसंधी आहे. आपल्या ज्ञानात, कौशल्यांमध्ये, मूल्यांमध्ये आणि आत्मविश्वासात सातत्याने वाढ करणे हीच खऱ्या यशाची सुरुवात आहे. आपली आवड, क्षमता आणि आजच्या काळातील गरजा यांचा सखोल विचार करून योग्य अभ्यासक्रमाची निवड करणे आवश्यक आहे. इतरांच्या प्रभावाखाली न जाता स्वतःच्या ध्येयाला साजेसा मार्ग निवडणे अधिक महत्त्वाचे आहे. आजचे युग हे सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचे आणि नव्या संधींचे आहे. त्यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची तयारी, सतत ज्ञान अद्ययावत ठेवण्याची वृत्ती आणि बदल स्वीकारण्याची मानसिकता प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), डेटा अॅनालिटिक्स, डिजिटल टूल्स, सायबर सुरक्षा, उद्योजकता यांसारख्या नव्या क्षेत्रांची माहिती करून घेऊन त्यामधील कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यशस्वी करिअर घडविताना वेळेचे आणि कामाचे योग्य नियोजन, शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी, तणावाचे योग्य व्यवस्थापन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. ज्ञान, कौशल्य, मूल्ये आणि उत्तम व्यक्तिमत्त्व यांचा समतोल विकास आवश्यक आहे. शिक्षण ही सर्वांची एक सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शैक्षणिक संस्था यांनी एकत्र येऊन परस्पर सहकार्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थी हा ज्ञानार्जनासाठी सदैव उत्सुक आणि जिज्ञासू असला पाहिजे. त्यासाठी योग्य वेळी योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्याची तयारी त्याच्यात असणे आवश्यक आहे. तसेच, निरंतर शिकण्याची वृत्ती आणि नवीन ज्ञान आत्मसात करण्याची इच्छा कायम जोपासली पाहिजे. आपल्यामधील कौशल्यांचा विकास करण्यासाठी विविध स्तरांवर सक्रिय राहिले पाहिजे. सांस्कृतिक, शैक्षणिक, संशोधनात्मक, व्यावहारिक, तांत्रिक कौशल्ये विकसित करावयाला हवीत. आजीवन शिक्षणाची तयारी हीच बदलत्या काळात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे.
स्वतःचे भविष्य घडविताना आपल्या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञतेची भावना मनात असली पाहिजे. आपल्या यशामागे पालक, शिक्षक, कुटुंबीय, मित्र आणि मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान असते. त्यामुळे त्यांच्या सहकार्याचे ऋण सदैव मान्य ठेवणे हीच खरी माणुसकी आहे. जीवनाचा हा प्रवास करताना प्रत्येक व्यक्तीसोबत जपलेल्या गोड आठवणींची शिदोरी घेऊन उंच आकाशामध्ये झेपावण्यासाठी आपण नक्कीच तयार होतो. उच्च शिक्षणातून सुरू केलेला प्रवास आपल्याला घेऊन जातो एका उज्ज्वल भविष्याकडे.
डॉ. पद्मावती एस. उंडाळे
सहयोगी प्राध्यापिका व आंतरराष्ट्रीय संबंध अधिकारी
एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय





