राम मंदिराला मिळाले पहिले CEO; एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी
कारगिल युद्धातील नायक, 38 वर्षांचा भारतीय हवाई दलाचा अनुभव; 5,500 अर्जांमधून 18 जणांच्या शॉर्टलिस्टमधून जितेंद्र मिश्रा यांची निवड

अयोध्या : अयोध्येतील भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या व्यवस्थापनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मिळाले असून, भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीच्या दिवसापासून पुढील तीन वर्षे ते राम मंदिराच्या CEO पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांचा भारतीय हवाई दलातील तब्बल 38 वर्षांचा अनुभव आहे. ते याच वर्षी एप्रिल महिन्यात हवाई दलातून निवृत्त झाले. लढाऊ विमान पायलट, कॉम्बॅट इन्स्ट्रक्टर आणि टेस्ट पायलट म्हणून त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
कारगिल युद्धातील सहभाग; सर्वोच्च युद्ध सेवा मेडलने सन्मान
जितेंद्र मिश्रा हे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्याचे रहिवासी असून, ते NDA खडकवासला येथील माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी 3,000 तासांहून अधिक काळ लढाऊ विमान उडवण्याचा अनुभव मिळवला आहे. 1999 च्या कारगिल युद्धासह ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना ‘सर्वोत्तम युद्ध सेवा मेडल’ प्रदान करण्यात आले आहे.
हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक; ‘12 सप्टेंबरला मुंबईकडे जाणार’
5,500 अर्जांमधून 18 जणांची निवड
राम मंदिराच्या CEO पदासाठी तब्बल 5,500 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून 18 उमेदवारांची शॉर्टलिस्ट करण्यात आली. निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची विविध स्तरांवर चाचणी घेण्यात आली. यामध्ये त्यांची जीवनशैली, धार्मिक आस्था आणि हिंदू धर्माशी संबंधित विविध बाबींवरही प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे.
या निवड प्रक्रियेसाठी ट्रस्टकडून निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली, विष्णुकांत चतुर्वेदी आणि सुरेश हावडे यांची तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.
CEO म्हणून कोणत्या जबाबदाऱ्या?
राम मंदिराच्या CEO पदावर जितेंद्र मिश्रा यांच्यावर मंदिराच्या प्रशासकीय, आर्थिक आणि कायदेशीर व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. मंदिराचा दैनंदिन कारभार, भाविकांच्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच आर्थिक पारदर्शकता राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
मंदिराच्या कारभारात अधिक शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी CEO पदाची गरज व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे लष्करी शिस्त आणि दीर्घ प्रशासकीय अनुभव असलेल्या जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती राम मंदिर व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.





