गणेशखिंडच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मनसेचे आंदोलन; अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरुद्ध गुन्हा
प्राचार्यांच्या कार्यालयात प्रवेश, पंतप्रधान मोदींची तसबीर हटवल्याचा आरोप; घोषणाबाजी आणि दमदाटीप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांकडून कारवाई

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात कथितरित्या बेकायदा प्रवेश करून घोषणाबाजी, गोंधळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र काशीराम पाटील यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, अमित ठाकरे हे सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास २० ते २५ पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयाच्या आवारात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी प्राचार्यांच्या कार्यालयात प्रवेश केला. यावेळी कार्यालयात लावलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसबीर हटविण्यात आल्याचा आरोप प्राचार्यांनी केला आहे. तसेच प्राचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धमकावल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या आवारात घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोपही प्राचार्यांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, या प्रकरणात अमित ठाकरे यांच्यासह संबंधित कार्यकर्त्यांना चौकशीसाठी लवकरच बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत.
हेही वाचा – पुतीन यांची भेट घेत मोदींचा स्पष्ट संदेश; ‘युक्रेन युद्धाचा आता अंत व्हायला हवा’
आंदोलनानंतर उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांची महाविद्यालयाला भेट
मनसेच्या आंदोलनानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट दिली. महाविद्यालयाच्या आवारातील अर्धवट बांधकामे आणि पायाभूत सुविधांबाबत त्यांनी माहिती घेतली. संबंधित बांधकाम ठेकेदाराशी संपर्क साधून काम संथगतीने सुरू असल्याबाबत त्यांनी विचारणा केली.
दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी हटविलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसबीर भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा प्राचार्यांच्या कार्यालयात लावल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे महाविद्यालय परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते.





