PCMC: नागरिकांच्या सूचनेवर तातडीची कृती; प्रभाग क्र. ८ मध्ये विकासकामांना वेग!
पेव्हिंग ब्लॉक दुरुस्ती, नवीन ड्रेनेज लाईनसह खड्डे बुजविण्याची कामे प्रगतीपथावर

शहर सुधारणा समिती सदस्य तथा नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांचा पुढाकार
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
नागरिकांच्या सूचनांना प्राधान्य देत प्रभाग क्र. ८ मधील विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी शहर सुधारणा समिती सदस्य तथा नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून मोशी प्राधिकरण, बालाजीनगर आणि स्पाइन रोड परिसरात विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत.
मोशी प्राधिकरण परिसरात खराब झालेले पेव्हिंग ब्लॉक दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसह परिसराचे सौंदर्य आणि रस्त्यांची गुणवत्ता कायम राखण्याच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉकची पुनर्बांधणी करण्यात येत आहे.
बालाजीनगर परिसरातील जुन्या ड्रेनेज लाईनमुळे नागरिकांना निर्माण होणाऱ्या समस्यांची दखल घेत नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. परिसरातील सांडपाण्याचा निचरा सुरळीत व्हावा, स्वच्छता टिकून राहावी आणि भविष्यात नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी जुनी व्यवस्था बदलून सक्षम नवीन यंत्रणा उभारली जात आहे.
हेही वाचा
‘गणेशम फेज-२’ दुर्घटनेनंतर भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आक्रमक
खड्डेमुक्त परिसरासाठी प्रयत्न…
तसेच, मोशी प्राधिकरण आणि स्पाइन रोड परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे डांबरीकरण करून बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार असून, वाहतुकीतील अडथळे कमी होण्यास मदत होणार आहे. प्रभागातील नागरिकांनी मांडलेल्या समस्या केवळ नोंदवून न ठेवता त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यावर डॉ. सुहास कांबळे यांनी भर दिला आहे. दर्जेदार मूलभूत सुविधा, सुरक्षित रस्ते, सक्षम ड्रेनेज व्यवस्था आणि स्वच्छ परिसर या उद्दिष्टांसाठी महापालिका प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. “नागरिकांची सूचना, आमची कृती” हा दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून प्रभाग क्र. ८ च्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू असल्याचे डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले.
“आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने प्रभाग क्र. ८ मधील प्रत्येक नागरी समस्या प्राधान्याने सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा देणे, सुरक्षित व खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देणे आणि स्वच्छ, विकसित प्रभाग घडविणे ही आमची कटिबद्धता आहे. नागरिकांच्या सूचनांवर तत्काळ कृती करून विकासकामांचा दर्जा व गती कायम ठेवली जाईल.”
– डॉ. सुहास कांबळे, सदस्य, शहर सुधारणा समिती, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.





