ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘गणेशम फेज-२’ दुर्घटनेनंतर भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आक्रमक

अग्निसुरक्षेवरून महापालिका प्रशासनाला आदेश

सात दिवसांत सोसायट्यांचा फायर ऑडिट अहवाल जाहीर करा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपळे सौदागर येथील ‘गणेशम फेज-२’ सोसायटीमध्ये १८ सप्टेंबर २०२६ रोजी घडलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेत महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी आणि प्रशासकीय नियोजनाचा अभाव समोर आल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी महापालिका आयुक्तांना कडक शब्दांत लेखी निवेदन दिले आहे.

शहरातील वाढत्या गगनचुंबी इमारतींचा विचार करून ५० ते ९० मीटर किंवा त्याहून अधिक उंचीपर्यंत पोहोचणाऱ्या अत्याधुनिक हायड्रोलिक शिड्या तातडीने खरेदी कराव्यात, अग्निशमन दलातील सर्व साधनसामग्रीचे ‘सेफ्टी ऑडिट’ करावे आणि शहरातील सोसायट्यांच्या ‘फायर ऑडिट’ची सद्यस्थिती सात दिवसांत सार्वजनिक करावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

‘गणेशम फेज-२’ सोसायटीतील आगीदरम्यान एका बंद सदनिकेत दोन लहान मुली अडकून पडल्या होत्या. त्यांचा जीव धोक्यात असताना अग्निशमन दलाकडील अपुरी व नादुरुस्त उपकरणे तसेच बचावकार्याच्या नियोजनातील त्रुटींमुळे मोहिमेत गंभीर अडथळे निर्माण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

हेही वाचा

गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’(Khokha Run) उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा

पिंपरी-चिंचवड शहरात २० ते ३० मजल्यांच्या उंच इमारती मोठ्या प्रमाणावर उभ्या राहत आहेत. मात्र, एवढ्या उंचीपर्यंत पोहोचू शकणाऱ्या आधुनिक हायड्रोलिक शिड्या आणि आवश्यक बचाव उपकरणे महापालिकेकडे उपलब्ध नसणे ही धक्कादायक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे काटे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या प्रमुख मागण्या :

अत्याधुनिक हायड्रोलिक शिड्यांची खरेदी : ५० ते ९० मीटर किंवा त्यापेक्षा अधिक उंचीपर्यंत पोहोचणाऱ्या आंतरराष्ट्रीय मानकांच्या हायड्रोलिक शिड्या आणि ‘ब्रोंटो स्कायलिफ्ट’सारखे आधुनिक प्लॅटफॉर्म अग्निशमन दलाच्या ताफ्यात तातडीने समाविष्ट करावेत., सात दिवसांत फायर ऑडिट अहवाल : शहरातील किती सोसायट्यांचे फायर ऑडिट पूर्ण झाले, किती ठिकाणी अग्निसुरक्षेच्या त्रुटी आढळल्या आणि किती सोसायट्यांना नोटिसा बजावण्यात आल्या, याचा विभागनिहाय सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा., अग्निशमन यंत्रणेचे सेफ्टी ऑडिट : अग्निशमन दलातील सर्व वाहने, पंप, ऑक्सिजन मास्क, शिड्या आणि बचाव उपकरणांची तातडीने तपासणी करावी. कालबाह्य व नादुरुस्त साहित्य वापरातून काढून त्याऐवजी अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी., आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण आणि मॉकड्रिल : अग्निशमन जवानांना उंच इमारतींमधील आपत्कालीन बचावकार्याचे विशेष प्रशिक्षण द्यावे. शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नियमित अग्निसुरक्षा जनजागृती आणि मॉकड्रिल आयोजित कराव्यात., आठ ते दहा दिवसांत ठोस कारवाईची मागणी : महापालिका प्रशासनाने या मागण्यांची गंभीर दखल घेऊन येत्या आठ ते दहा दिवसांत ठोस उपाययोजना सुरू कराव्यात. अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर भाजप अधिक आक्रमक भूमिका घेईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

“पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाचा आणि लहान मुलांचा जीव अत्यंत मोलाचा आहे. केवळ इमारतींना मंजुरी देणे आणि करवसुली करणे एवढ्यापुरती महापालिकेची जबाबदारी मर्यादित नाही; नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देणेही प्रशासनाचे कर्तव्य आहे. ‘गणेशम फेज-२’मधील घटना ही प्रशासनासाठी शेवटची धोक्याची घंटा समजावी. येत्या आठ ते दहा दिवसांत ठोस पावले उचलावीत.”

– शत्रुघ्न (बापू) काटे, शहराध्यक्ष, भाजपा पिंपरी-चिंचवड शहर.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button