पुतीन यांची भेट घेत मोदींचा स्पष्ट संदेश; ‘युक्रेन युद्धाचा आता अंत व्हायला हवा’
SCO शिखर परिषदेत भारत-रशिया संबंधांवरही चर्चा; पश्चिम आशियातील संघर्षावर संवाद-कूटनीतीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन

किर्गिस्तान : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांसह विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली. युक्रेनमधील युद्ध संपवण्याची गरज असल्याचा स्पष्ट संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचे समोर आले आहे.
मानवतेच्या हितासाठी सुरू असलेल्या अंतहीन युद्धाचा आता अंत व्हायला हवा, अशी भूमिका मोदी यांनी मांडली. भारताने रशिया-युक्रेन युद्धात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला पाठिंबा दिला आहे. सर्व प्रश्नांचा शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढणे ही मानवतेची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘युद्धाचा प्रत्येक दिवस मानवतेला मागे घेऊन जातो’
पुतीन यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान सर्व मुद्द्यांचे निराकरण संवाद आणि शांततापूर्ण मार्गाने झाले पाहिजे, असे मोदी यांनी सांगितले. युद्धाचा प्रत्येक दिवस मानवतेला मागे घेऊन जात असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी भारत आणि रशियामधील व्यापार तसेच दोन्ही देशांमधील मैत्री नवनवीन उंची गाठत असल्याबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केले.
मोदी आणि पुतीन यांच्या भेटीचा व्हिडीओही समोर आला असून, दोन्ही नेते एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत
हेही वाचा – ऊसाला ७ हजारांचा दर दिल्याशिवाय कोयतं लावू देणार नाही; सदाभाऊ खोतांचा साखर कारखानदारांना इशारा
इराणच्या राष्ट्राध्यक्षांचीही भेट
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांची भेट घेतली. या बैठकीत भारत-इराण द्विपक्षीय संबंध, व्यापार तसेच पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा झाली.
भारताला आगामी काळात इराणसोबतचा द्विपक्षीय व्यापार वाढवायचा असून, व्यापारात विविधता आणण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. पश्चिम आशियातील संघर्षावर संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पश्चिम आशियातील तणावावर भारताची चिंता
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, मोदी आणि पेजेश्कियान यांनी पश्चिम आशियातील संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीवर विचारांची देवाणघेवाण केली. या भागातील वाढत्या तणावाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली.
सर्व प्रश्न संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून सोडवले जावेत, या भारताच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम आशियात कायमस्वरूपी शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले.





