एका सुवर्णपर्वाचा अंत! दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती

Lionel Messi Retirement | जागतिक फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी सोशल मीडियावर तीन पानांचे अत्यंत भावुक पत्र शेअर करत मेस्सीने अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाला आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केला. ३१ ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीतील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
आपल्या निवृत्तीच्या पत्रात मेस्सीने लिहिले की, “अंतिम सामन्याला बराच काळ उलटून गेल्यानंतर मी या निर्णयाचा सखोल विचार केला. अखेर मी अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेत आहे. हा निर्णय घेताना मनाला खूप वेदना झाल्या आणि आजही होत आहेत. मात्र, आता हीच योग्य वेळ असल्याचे मला जाणवत आहे. संघाने जे काही मिळवले त्याआधीपासूनच मी या संघासाठी आणि जर्सीसाठी माझे सर्वस्व पणाला लावले. चाहत्यांना आनंदाचे क्षण देण्यासाठी आणि फुटबॉलच्या माध्यमातून अर्जेंटिनाचा नागरिक असल्याचा अभिमान वाटावा, यासाठी मी नेहमीच पूर्ण ताकदीने लढलो.”
तो पुढे म्हणाला, “आता एका पर्वाचा शेवट होत आहे. राष्ट्रीय संघात खेळणे मला नेहमीच आवडले, आजही आवडते आणि भविष्यातही आवडत राहील. मी माझ्याकडचे सर्व काही या खेळाला दिले आहे, आता देण्यासाठी माझ्याकडे काहीच उरलेले नाही. त्याचवेळी माझ्यामागे काही अत्यंत प्रतिभावान युवा खेळाडू आहेत, जे या संघात स्थान मिळवण्यास पात्र आहेत. गेल्या २० वर्षांत दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी सर्व चाहत्यांचे आणि पाठीशी उभे राहिलेल्या कुटुंबाचे मनापासून आभार. आता मी चाहत्यांमधीलच एक असेन आणि बाहेरून संघाला नेहमीच पाठिंबा देत राहीन.”
हेही वाचा
“डीजेच्या वादात पडू नका, सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा”; मुख्यमंत्र्यांचे पुणेकरांना आवाहन
View this post on Instagram
अविस्मरणीय आंतरराष्ट्रीय कारकीर्द
मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सुवर्णक्षण २०२२ मध्ये आला, जेव्हा त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने कतारमध्ये ऐतिहासिक फिफा विश्वचषक जिंकला. १९८६ नंतरचा अर्जेंटिनाचा हा पहिलाच विश्वचषक विजय होता. या स्पर्धेत मेस्सीने सात गोल करत अर्जेंटिनाला जगज्जेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.
याव्यतिरिक्त, मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने २०२१ आणि २०२४ मध्ये सलग दोनदा ‘कोपा अमेरिका’ चषक पटकावला. त्याने संघाला २०२६ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंतही नेले, जिथे स्पेनविरुद्धचा अंतिम सामना गमावल्यामुळे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मेस्सीचा हा सहावा विश्वचषक होता आणि विश्वचषक इतिहासात सर्वाधिक वेळा सहभागी होणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत त्याने आपले स्थान कायम केले आहे.





