TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘स्कूल ठीक करो’ अभियानातून दादा भुसेंना दीपकेंचा इशारा; १५ दिवसांत अहवाल, त्यानंतर आंदोलनाची घोषणा

हिंगोलीतील जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था पाहून संताप; शिक्षकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा अभिजीत दीपकेंचा निर्धार

हिंगोली : जिल्हा परिषद शाळांमधील दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करत ‘कॉक्रोच जनता पक्षा’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत पुढील १५ दिवस राज्यातील विविध शाळांची पाहणी करून सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार असून, त्यानंतर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना सोबत घेत आंदोलन छेडणार असल्याचे दीपके यांनी सांगितले.

हिंगोलीतील शाळांची पाहणी; वर्गखोल्यांमध्ये धान्याचा साठा

अभिजीत दीपके हे ‘स्कूल ठीक करो’ अभियानासाठी हिंगोली जिल्ह्यात तिसऱ्यांदा शाळांच्या पाहणीसाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी सेनगाव तालुक्यातील लोहगाव, करंजाळा आणि जामदया येथील जिल्हा परिषद शाळांची पाहणी केली.

पाहणीदरम्यान शाळेतील वर्गखोलीतच धान्य साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप करत दीपके यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.

हेही वाचा –  तुकाराम मुंढेंच्या FDAला हायकोर्टाचा दणका

अंधार कोठडीतविद्यार्थ्यांचे शिक्षण

जामदया येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक अंधार असलेल्या वर्गखोलीत शिक्षण घेत असल्याचे दीपके यांच्या पाहणीत समोर आले. हिंगोली, सेनगाव आणि औंढा तालुक्यांतील शाळांची पाहणी केल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहांची स्थिती खराब असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर सरकारी शाळांच्या गुणवत्तेबाबत सरकारची भूमिका काय, असा सवाल करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला.

शिक्षकांची रिक्त पदे, पाणी आणि वर्गखोल्यांचा प्रश्न

दीपके यांनी यापूर्वी १८ ऑगस्ट रोजी हिंगोली तालुक्यातील लिंबाळा (मक्ता) येथील जिल्हा परिषद शाळेलाही भेट दिली होती. त्यावेळी शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासह शाळेतील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आंदोलन केले होते.

सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि वर्गखोल्यांची दुरवस्था अशा अनेक समस्या असल्याचा आरोप त्यांनी केला. या समस्यांकडे सरकारी यंत्रणा गांभीर्याने पाहत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

सरकारी शाळांची दयनीय अवस्था

सरकारी शाळांची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप दीपके यांनी केला. सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांची मुले खासगी शाळांमध्ये शिकत असल्याने सरकारी शाळांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी यापूर्वी केली होती.

आता सेनगाव तालुक्यातील शाळांच्या पाहणीत पुन्हा गंभीर समस्या समोर आल्याने त्यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. पुढील १५ दिवसांत राज्यातील शाळांची पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल तयार करण्यात येणार असून, त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button