Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

Nepal Flood Updates : पुराच्या पाण्यात वाहून आलेला बँकेचा लॉकर फोडला; 29 जण ताब्यात, कोट्यवधींची रोकड जप्त

मृत महिलेच्या कानातील सोन्याच्या बाळ्या चोरल्याचा आरोप; नेपाळमधील भीषण पुरात मृतांचा आकडा 626 वर

काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली असताना, या आपत्तीच्या काळात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनाही समोर आल्या आहेत. रसुवा परिसरातून पुराच्या प्रवाहात वाहून आलेला बँकेचा लॉकर फोडून त्यातील रोकड चोरल्याच्या आरोपावरून नेपाळ पोलिसांनी 29 जणांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून 92 लाख 68 हजार 505 नेपाळी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी परिसरातून पुराच्या जोरदार प्रवाहात बँकेची जड तिजोरी वाहून गेली होती. ही तिजोरी धादिंग जिल्ह्यातील गल्छी गावपालिका-4 येथील बेलखूखोला परिसरातील त्रिशूली नदीच्या काठावर आढळून आली.

स्थानिक नागरिक हा लॉकर फोडून त्यातील पैसे काढत असल्याची माहिती धादिंग पोलिसांना मिळाली. त्यानंतर नेपाळ पोलीस आणि सशस्त्र प्रहरी बलाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी 29 जणांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी त्यांच्याकडून 92,68,505 नेपाळी रुपये जप्त केले आहेत. ही रोकड नेमकी कोणत्या बँकेची आहे, तसेच या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.

हेही वाचा –  ‘स्कूल ठीक करो’ अभियानातून दादा भुसेंना दीपकेंचा इशारा; १५ दिवसांत अहवाल, त्यानंतर आंदोलनाची घोषणा

पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या मृतदेहांबाबतही धक्कादायक घटना समोर आली आहे. नारायणी नदीजवळ पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका मृत महिलेच्या कानातील सोन्याच्या बाळ्या दोन व्यक्तींनी काढून घेतल्याचा आरोप आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

नेपाळमध्ये मृतांचा आकडा 626 वर

दरम्यान, नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) शनिवारी आपत्तीची अद्ययावत आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, या भीषण पूर आणि भूस्खलनाच्या आपत्तीत आतापर्यंत 626 जणांचे मृतदेह सापडले आहेत.

बेपत्ता व्यक्तींच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत 1,924 जण बेपत्ता असल्याची माहिती होती. शनिवारी हा आकडा वाढून 2,426 वर पोहोचला आहे. यामध्ये 517 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

मदत आणि बचावकार्य सुरू

नेपाळमधील पूरग्रस्त भागांमध्ये मदत आणि बचावकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी तसेच बेपत्ता व्यक्तांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके कार्यरत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button