TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भात पुन्हा पावसाची जोरदार हजेरी; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

बंगालच्या खाडीत नवी हवामान प्रणाली सक्रिय; २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

नागपूर : बंगालच्या खाडीत नव्या हवामान प्रणालीची निर्मिती होत असून, तिचे पुढे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या प्रणालीचा परिणाम विदर्भातील हवामानावर होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढू शकतो. दरम्यान, राज्यात मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला असला तरी कोकणात २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढणार

बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागासह पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीलगत २९ ऑगस्टच्या सुमारास कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील पावसाचा जोर पुढील तीन दिवस वाढण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

२९ ते ३१ ऑगस्टदरम्यान विदर्भातील काही भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २८ ऑगस्टला विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, २९ ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून अनेक भागांत मध्यम ते मुसळधार सरी कोसळू शकतात.

नागपूरसह चार जिल्ह्यांवर विशेष लक्ष

नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता तुलनेने अधिक राहण्याची शक्यता आहे. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांत २९ व ३१ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गोंदिया जिल्ह्यात २९ आणि ३० ऑगस्ट रोजी, तर गडचिरोली जिल्ह्यात ३० ऑगस्टला काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, ईशान्य उत्तर प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील २४ तासांत क्षीण होण्याची शक्यता आहे. मात्र, बंगालच्या खाडीत निर्माण होत असलेल्या नव्या हवामान प्रणालीमुळे विदर्भातील पावसाच्या स्थितीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. पुढील सात दिवसांत विदर्भातील कमाल आणि किमान तापमानात मोठा बदल होणार नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा –  Friday OTT Release: रक्षाबंधनाच्या लॉन्ग वीकेंडला मनोरंजनाची मेजवानी; OTT वर 10 नवे चित्रपट आणि वेब सीरिज

कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला असला तरी कोकणात २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी हवामान विभागाच्या पुढील सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या इशाऱ्यांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती बदलण्याची शक्यता

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाची प्रणाली दक्षिणेकडील कोमोरिन क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेशाच्या दिशेने सरकण्याचा अंदाज आहे. या काळात महाराष्ट्र, तेलंगणा आणि किनारपट्टीच्या कर्नाटकातील काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तराखंडमधील काही भागांतही पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते. मान्सूनचा जोर उत्तरेकडील भागात हळूहळू कमी होत असताना महाराष्ट्रातील पावसाची स्थिती संमिश्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी दिवसांतील पावसाचे वितरण शेती आणि जलसाठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button