Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सप्टेंबरपासून ‘डबल महागाई’चा झटका; दूध आणि रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार

दुधाच्या घाऊक दरात प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ; सीएनजी आणि देखभाल खर्चामुळे रिक्षा-टॅक्सी भाड्यातही वाढीची शक्यता

मुंबई : सप्टेंबर महिना सुरू होताच मुंबईकरांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदीच्या काळात एका बाजूला दुधाच्या दरात वाढ होत असताना, दुसऱ्या बाजूला ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यातही वाढ होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे दैनंदिन प्रवास आणि घरगुती खर्च या दोन्ही बाबींमध्ये मुंबईकरांना महागाईचा दुहेरी फटका बसू शकतो.

रिक्षा-टॅक्सी प्रवासासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या सीएनजीच्या दरात झालेली वाढ तसेच वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा वाढता खर्च लक्षात घेऊन ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीच्या किमान भाड्यात १ ते २ रुपयांची वाढ होण्याची शक्यता असून, त्यानंतरच्या प्रति किलोमीटर दरातही बदल करण्यात येऊ शकतो.

याचा परिणाम रोज ऑफिसला जाणारे कर्मचारी, विद्यार्थी तसेच दैनंदिन कामानिमित्त रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. नियमित प्रवास करणाऱ्यांच्या मासिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

दुधाच्या घाऊक दरात प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ

दरम्यान, पशुखाद्य आणि इतर आवश्यक घटकांच्या वाढत्या किमतीमुळे दुधाच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई दूध उत्पादक संघटनेने दुधाचा घाऊक दर प्रतिलिटर ९३ रुपयांवरून १०२ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच प्रतिलिटर तब्बल ९ रुपयांची वाढ होणार आहे.

पशुखाद्य, पेंड तसेच इतर खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमतीमुळे दूध उत्पादकांवरील उत्पादन खर्च वाढला आहे. धान्य, हळद, हरभरा आणि इतर पशुखाद्याच्या वस्तूंच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा –  विदर्भात पुन्हा पावसाची जोरदार हजेरी; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

१ सप्टेंबरपासून नवे दर लागू

संघटनेचे अध्यक्ष चंद्रकुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधाचे नवे दर १ सप्टेंबर २०२६ पासून लागू होणार असून ते २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत लागू राहतील. जोगेश्वरी येथील दिवाण सेंटर हॉलमध्ये झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महिन्याच्या बजेटवर वाढता ताण

दूध आणि प्रवास खर्चातील संभाव्य वाढीमुळे सामान्य मुंबईकरांच्या मासिक बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दररोज दोन लिटर दूध वापरणाऱ्या कुटुंबाच्या मासिक खर्चात वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे रोज रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या प्रवासाच्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button