राज्यातील पिण्याच्या पाण्यात रासायनिक प्रदूषणाचे संकट
रासायनिक गुणवत्तेतील त्रुटी आढळलेल्या पाण्याची तपासणी; नागरिकांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यावर भर

पुणे : राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तपासणीत काही जिल्ह्यांमध्ये पाण्यात रासायनिक घटकांचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा कमी-अधिक असल्याचे आढळले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात स्थानिक पातळीवर आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जल जीवन मिशनअंतर्गत चालू आर्थिक वर्षात राज्यभरातून प्राप्त झालेल्या 5 लाख 47 हजार 688 पाणी नमुन्यांपैकी 1 लाख 72 हजार 888 नमुन्यांची रासायनिक गुणवत्तेच्या आधारे तपासणी करण्यात आली. या तपासणीत पाण्यातील आम्लता, विरघळलेले क्षार, कॅल्शियम-मॅग्नेशियम, क्लोराईड, सल्फेट, नायट्रेट, लोह, मॅंगेनीज, अमोनियम, शिसे, तांबे, झिंक आणि बोरॉन यांसारख्या घटकांचे प्रमाण तपासण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातून तपासण्यात आलेल्या 6 हजार 65 पाणी नमुन्यांपैकी 1 हजार 904 नमुन्यांमध्ये रासायनिक प्रमाणकांमध्ये कमी-अधिक प्रमाण आढळून आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर होणार
राज्यात नांदेड जिल्ह्यातील 7 हजार 133 नमुन्यांपैकी 2 हजार 953 नमुने, तर सोलापूर जिल्ह्यातील 12 हजार 82 नमुन्यांपैकी 2 हजार 560 नमुन्यांमध्ये रासायनिक गुणवत्तेतील त्रुटी आढळल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 390, नाशिकमध्ये 714, यवतमाळमध्ये 532 आणि जळगावमध्ये 147 पाणी नमुने रासायनिकदृष्ट्या दूषित अथवा प्रमाणकांमध्ये त्रुटी असलेले आढळले आहेत.
पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर प्रशासनाचा भर आहे. नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील कार्यवाही केली जात आहे.





