TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर होणार

तांत्रिक अडचणी आणि ई-केवायसीमुळे वंचित राहिलेल्या सुमारे एक लाख शेतकऱ्यांचाही लाभार्थी यादीत समावेश होण्याची शक्यता

मुंबई : कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शेतकरी कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता असून, या यादीत सुमारे 6 लाख 30 हजार शेतकऱ्यांचा समावेश असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या लाभार्थ्यांसाठी एकूण 5 हजार 80 कोटी रुपये वितरित केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील दोन याद्यांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही या टप्प्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या सुमारे एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हिंगोलीत 43 हजारांहून अधिक शेतकरी पात्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 43 हजार 525 शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी 33 हजार 926 लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा –  अमरावती रुग्णालयातील आगीप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार; बावनकुळेंचा इशारा

53 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या आठवड्यात शेतकरी कर्जमाफीबाबत माहिती देताना राज्यातील 53 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले होते. सरकारने सुमारे 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा दावाही त्यांनी केला होता.

तसेच हजारो शेतकऱ्यांची वीजबिले माफ करण्यात आली असून, शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज आणि पाणी उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले होते.

आता तिसरी यादी जाहीर झाल्यानंतर लाखो शेतकऱ्यांना आपल्या नावाचा लाभार्थी यादीत समावेश झाला आहे का, हे तपासता येणार असून, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button