TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सणासुदीच्या काळात FDA ची राज्यभर धडक; १.३६ कोटींचे संशयास्पद अन्नपदार्थ जप्त

मुंबईतील Swiggy Instamartसह अनेक आस्थापनांवर कारवाई; उंदीर, झुरळांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छता आढळल्याने परवाने निलंबित

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त, संशयास्पद आणि अस्वच्छ अन्नपदार्थांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष मोहीम राबवली आहे. १७ ते २० सप्टेंबरदरम्यान झालेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, मुंबईसह विविध ठिकाणी अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळले आहे. तुकाराम मुंढे हे सध्या महाराष्ट्र FDA चे आयुक्त आहेत.

मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील Swiggy Instamartच्या एका डार्क स्टोअरमध्ये तपासणीदरम्यान जिवंत उंदीर, उंदरांनी कुरतडलेल्या तांदळाच्या पिशव्या आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळल्याचे वृत्त आहे. या गंभीर स्वच्छता त्रुटींनंतर संबंधित आस्थापनाचा खाद्य परवाना निलंबित करण्यात आला.

कांदिवलीतील Amazonसाठी काम करणाऱ्या एका गोदामावरही स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने कारवाई करण्यात आली. याशिवाय मुंबईतील काही मिठाई दुकाने आणि खाद्य आस्थापनांवरही तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींनुसार परवाना निलंबन अथवा अन्य नियामक कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा –  राज्यात १ हजार रोजगार मेळावे; २,५०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग, युवकांसाठी मोठ्या संधी

राज्यातील इतर भागांतही FDAची तपासणी मोहीम सुरू आहे. यापूर्वी ठाणे जिल्ह्यात ९ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईत ११ आस्थापनांची तपासणी करून सुमारे २०.४८ लाख रुपयांचे अन्नपदार्थ, कच्चा माल आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले होते.

सणासुदीच्या काळात खवा, मावा, मिठाई, तूप, तेल, सुकामेवा आणि इतर खाद्यपदार्थांच्या विक्रीत वाढ होत असल्याने FDAकडून तपासणी आणि नमुने घेण्याची प्रक्रिया अधिक तीव्र करण्यात आली आहे. भेसळ, अयोग्य साठवणूक किंवा अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थांची हाताळणी आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.

दरम्यान, नागरिकांनी संशयास्पद किंवा अस्वच्छ अन्नपदार्थ विक्रीबाबत प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. FDAच्या अधिकृत संकेतस्थळावर अन्नविषयक तक्रारी नोंदवण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button