सरकारने आश्वासन पूर्ण करावे; कॉक्रोच जनता पार्टीचा शांततापूर्ण आंदोलनाचा इशारा
FIR मागे घेणे आणि नीट पीडित कुटुंबांना मदतीचे आश्वासन पूर्ण करण्याची मागणी; 24 ऑगस्टच्या बैठकीत पुढील रणनीती ठरणार

नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीने मोदी सरकारच्या आश्वासनांबाबत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप करत पक्षाने पुन्हा शांततापूर्ण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सरकारच्या आश्वासनानंतर 25 जुलै रोजी आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, आता सरकारकडून आश्वासनांची पूर्तता होत नसल्याचा दावा पक्षाने केला आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या लीगल टीम आणि विद्यार्थी नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारकडे विद्यार्थी आणि आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या FIRची यादी मागण्यात आली. संविधानाच्या कलम 142 अंतर्गत ही प्रकरणे एकाच वेळी रद्द करण्याची प्रक्रिया सुलभ होऊ शकते, असा पक्षाचा दावा आहे.
मात्र, न्यायालयाने वारंवार विचारणा करूनही केंद्र सरकारने FIRची यादी सादर करण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नसल्याचा आरोप सीजेपीचे सहसंयोजक सौरव दास आणि रत्ना सिंह यांनी केला.
हेही वाचा – ओबीसींच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक; चर्चेतून मार्ग काढत आहोत : मंत्री छगन भुजबळ
आंदोलन मागे घेताना सरकारने संयुक्त पत्रकार परिषदेत दोन प्रमुख आश्वासने दिली होती, असा दावा पक्षाने केला आहे. विद्यार्थी आणि आंदोलकांविरोधातील FIR तातडीने मागे घेणे किंवा रद्द करणे तसेच भविष्यात त्यांच्यावर कारवाई न करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असे सीजेपीने म्हटले आहे.
नीट पेपरफुटीच्या प्रकरणानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करत, संबंधित पीडित कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप औपचारिक लेखी आश्वासन मिळाले नसल्याचे पक्षाने म्हटले आहे.
24 ऑगस्टला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
कॉक्रोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 24 ऑगस्ट रोजी होणार आहे. या बैठकीत सरकारच्या आश्वासनांच्या पूर्ततेचा आढावा घेऊन पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे. सरकारने आश्वासने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला असून, गरज पडल्यास देशव्यापी शांततापूर्ण आंदोलन करण्याचेही संकेत दिले आहेत.





