मुख्यमंत्री फडणवीस यांनी घडवले तीन पार्थिव शिवलिंग; नागपुरातील ९१ लाख शिवलिंग निर्मिती सोहळ्याला भेट
श्रावणातील धार्मिक उपक्रमात मुख्यमंत्र्यांचा सहभाग; १३ ऑगस्ट ते १२ सप्टेंबरदरम्यान सुरू राहणार सोहळा

नागपूर : मानकापूर येथील लोटस कल्चरल ॲण्ड स्पोर्टिंग असोसिएशनतर्फे शिवमंदिर परिसरात आयोजित पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः या धार्मिक उपक्रमात सहभागी होत तीन पार्थिव शिवलिंगांची निर्मिती केली.
मंत्रोच्चार आणि जयघोषाच्या वातावरणात मुख्यमंत्र्यांनी प्रथम शिवलिंगाचे दर्शन घेतले. सोहळ्याचे संयोजक दयाशंकर तिवारी, अनिल बावनगडे, अमोल कोल्हे, आशिष पाली, नवीन जैन, प्रभाकर ठाकरे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
श्रावण महिन्यात आयोजित या सोहळ्यामुळे परिसरातील वातावरण पवित्र झाले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. महिला, पुरुष, दिव्यांगजन आणि बालकेही पार्थिव शिवलिंग निर्मितीत सहभागी होत असल्याचे दृश्य प्रसन्नता निर्माण करणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय संस्कृतीत शिवआराधनेला विशेष महत्त्व आहे. शिव हे आदी-अनंताचे प्रतीक असून शिवपूजेतून आत्मिक शांतता आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा – सरकारने आश्वासन पूर्ण करावे; कॉक्रोच जनता पार्टीचा शांततापूर्ण आंदोलनाचा इशारा
यंदाच्या उपक्रमात ९१ लाख पार्थिव शिवलिंग निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे. १३ ऑगस्ट ते १२ सप्टेंबरदरम्यान महिनाभर हा सोहळा सुरू राहणार असून सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
गंगेच्या तीरावरून आणली माती
या सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे. पार्थिव शिवलिंग निर्मितीसाठी गंगा नदीच्या तीरावरून माती आणण्यात आली आहे. दररोज सूर्यास्तानंतर तयार करण्यात आलेल्या पार्थिव शिवलिंगांचे विसर्जन केले जाते. १२ सप्टेंबर रोजी यज्ञ आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती संयोजक दयाशंकर तिवारी यांनी दिली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.





