अमरावतीच्या तरुणांना AI तंत्रज्ञानातून कौशल्य विकासाची संधी; बावनकुळेंचे आश्वासन
युवकांनी AIच्या सदुपयोगावर भर द्यावा; मेळघाट महोत्सवातून सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातही संधी देणार

अमरावती : युवा पिढीला कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध कौशल्ये आत्मसात करता यावीत, तसेच त्यांना आवड आणि क्षमता असलेल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
नवराष्ट्र युथ फाऊंडेशनच्या वतीने सायन्स कोर मैदानावर आयोजित तीन दिवसीय ‘अमरावती युवा महोत्सवा’चे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रवीण तायडे, नवराष्ट्र युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष हिमांशु पाटील, ह.भ.प. प्रशांत महाराज ठाकरे आदी उपस्थित होते.
युवा महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवतींची प्रतिभा, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडणार आहे. अमरावती आणि विदर्भाच्या मातीचे संस्कार त्यांच्या सादरीकरणातून दिसून येतील. ज्ञान, तंत्रज्ञान आणि कल्पकतेच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या उभारणीत युवा पिढी महत्त्वाचे योगदान देऊ शकते, असे बावनकुळे म्हणाले.
राज्य शासनाने AI आधारित तंत्रज्ञानावर विशेष भर दिला असून युवकांना या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यात येत आहे. अमरावतीसह राज्यातील युवकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांना राज्य शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
हेही वाचा – सिंधुदुर्गातील १,३०० शाळांचा होणार प्रत्यक्ष पाहणीतून ‘रिअॅलिटी चेक’; नितेश राणेंचे निर्देश
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कौशल्य विकास आणि सकारात्मक कामांसाठी करण्याचे आवाहनही बावनकुळे यांनी युवकांना केले. AIच्या सदुपयोगावर भर देतानाच त्याच्या दुरुपयोगापासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.
येत्या २५ डिसेंबर रोजी चिखलदरा येथे आयोजित मेळघाट महोत्सवात युवकांना सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवराष्ट्र युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष हिमांशु पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. २३ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवात दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये शिक्षणतज्ज्ञांची व्याख्याने, युथ पार्लमेंट, गरबा नाईट, स्टार्टअप एक्स्पो स्पर्धा आणि ‘अमरावती गॉट टॅलेंट’ यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. युवा महोत्सवाच्या माध्यमातून अमरावतीच्या युवकांना कला, कौशल्य, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रातील विविध संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.





