पोलीस श्वानांना निवृत्तीनंतरही पोलिस दलातच ‘घर’; मुख्यमंत्री फडणवीसांचा संवेदनशील निर्णय
१० वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतरही रखवालदारांसोबत राहता येणार; आहार, आरोग्य आणि देखभालीचा खर्च गृह विभाग करणार

मुंबई : गुन्हेगारांचा माग काढणे, स्फोटकांचा शोध घेणे, अमली पदार्थ शोधून काढणे, बचाव मोहिमांमध्ये मदत करणे अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडणारे पोलीस श्वान आता निवृत्तीनंतरही पोलिस दलासोबतच राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील निर्णयामुळे पोलीस श्वानांच्या निवृत्तीपश्चात देखभाल आणि संगोपनासाठी नवी व्यवस्था करण्यात येणार आहे.
पोलीस श्वान पथकातील श्वान साधारण ६ ते ९ आठवड्यांचा असतानाच प्रशिक्षणासाठी पोलिस दलात दाखल होतो. त्यानंतर अनेक वर्षे तो विविध आव्हानात्मक मोहिमांमध्ये पोलिसांचा विश्वासू सहकारी म्हणून काम करतो. स्फोटके, अमली पदार्थ शोधणे, गुन्हेगारांचा माग काढणे तसेच दुर्घटनास्थळी बचाव कार्यातही या श्वानांची भूमिका महत्त्वाची ठरते.
सध्या पोलीस श्वानांचा सेवाकाळ १० वर्षांचा निश्चित करण्यात आला आहे. या काळात त्यांच्या प्रशिक्षणासह देखभालीसाठी पोलीस कर्मचारी नियुक्त केले जातात. अनेक वर्षे एकत्र राहिल्याने श्वान आणि त्याच्या रखवालदारामध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते.
सेवाकाळ संपल्यानंतर श्वानाला सक्षम पालकांकडे दत्तक देण्याची कार्यपद्धती आहे. मात्र, पोलिस दल आणि आपल्या रखवालदारापासून दूर गेल्यानंतर काही श्वानांना नव्या वातावरणाशी जुळवून घेण्यात अडचणी येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या परिस्थितीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर करण्यात आला. त्यानंतर त्यांनी गृह विभागाला तातडीने आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
दहा वर्षे पोलिस दलासाठी स्वामिनिष्ठेने आणि अथकपणे सेवा दिल्यानंतर अशा श्वानाची निवृत्तीनंतरही योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. त्याला उर्वरित आयुष्यही सुरक्षित आणि परिचित वातावरणात घालवता यावे, यासाठी पोलीस दलातच व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
हेही वाचा – पुण्यात राहुल गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक; ‘धमकावलं तरी लढत राहा’, कार्यकर्त्यांना कानमंत्र
नव्या व्यवस्थेनुसार पोलीस श्वान निवृत्त झाल्यानंतरही पोलिस दलासोबतच राहू शकणार आहे. त्याच्या आहारासाठी, आरोग्य तपासणीसाठी आणि आवश्यक देखभालीसाठी आर्थिक तरतूद करण्याची जबाबदारी गृह विभागाकडून घेतली जाणार आहे.
पोलीस दलासाठी सुमारे १० वर्षे सेवा बजावल्यानंतर या श्वानांचे उर्वरित आयुष्य तुलनेने कमी असते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूपर्यंत योग्य संगोपन, आरोग्य सेवा आणि देखभाल पोलिस दलाकडूनच केली जाईल.
या निर्णयामुळे निवृत्तीनंतर श्वानाला आपल्या परिचित वातावरणापासून आणि त्याच्या रखवालदारापासून दूर जावे लागणार नाही. अनेक वर्षांत निर्माण झालेले भावनिक बंध कायम राहतील आणि पोलीस दलातील या मुक्या शूर शिलेदारांचे उर्वरित आयुष्य अधिक सुखकर होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाचे प्राणीप्रेमी आणि श्वानप्रेमींकडून स्वागत करण्यात येत असून, पोलिस दलाचा अविभाज्य भाग असलेल्या या विश्वासू श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनालाही सन्मान मिळणार आहे.





