TOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजावर टॉर्पेडो हल्ला; देवरियाच्या भारतीय खलाशाचा मृत्यू

‘एमव्ही केप दाओ’वर दोन टॉर्पेडो आदळले; सूरज यादव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, ओमानच्या तटरक्षक दलाकडून क्रूची सुटका

Hormuz :ओमानच्या किनाऱ्याजवळील होर्मुझच्या सामुद्रधुनीत ‘एमव्ही केप दाओ’ या मालवाहू जहाजावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात उत्तर प्रदेशातील देवरिया येथील भारतीय खलाशी सूरज यादव यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय दूतावासाने या घटनेची पुष्टी केली असून, ओमानी अधिकाऱ्यांच्या समन्वयाने जहाजावरील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

अँटिग्वा आणि बार्बुडा ध्वजांकित ‘एमव्ही केप दाओ’ हे जहाज भारताच्या दिशेने जात असताना हल्ल्याचे लक्ष्य बनले. Forward Seamen’s Union of India (FSUI) नुसार जहाजावर एकूण २८ कर्मचारी होते आणि त्यापैकी २० भारतीय होते. मात्र, ओमानमधील भारतीय दूतावासाने आपल्या निवेदनात १९ भारतीय नागरिक जहाजावर असल्याचे म्हटले आहे.

FSUI नुसार जहाजावर दोन टॉर्पेडो आदळले. त्यापैकी एक जहाजाच्या पोर्ट साइडवरील C-Deck म्हणजेच निवासाच्या भागाजवळ, तर दुसरा इंजिन रूमच्या भागाला लागला. हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली आणि जहाजाच्या काही महत्त्वाच्या यंत्रणांवर परिणाम झाला.

हेही वाचा –  वारकरी संप्रदायासाठी भजनी मंडळांना मोठे पाठबळ; २ हजार मंडळांना मिळणार २५ हजारांचे अनुदान

सूरज यादव यांना गंभीर दुखापत

FSUI आणि उपलब्ध वृत्तांनुसार, वायपर म्हणून कार्यरत असलेल्या सूरज यादव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. जहाजावरील उर्वरित कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे ओमानमध्ये हलवण्यात आले असून, एका भारतीय चौथ्या इंजिनिअरलाही किरकोळ दुखापत झाल्याचे वृत्त आहे.

भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, या घटनेनंतर ओमानच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे. तसेच संबंधित RPSL संस्थेसोबत समन्वय साधून मृत खलाशाच्या कुटुंबीयांच्या संपर्कात दूतावास आहे.

खलाशी संघटनेकडून सुरक्षेची मागणी

या घटनेनंतर Forward Seamen’s Union of India ने भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीसह आसपासच्या सागरी मार्गांवर कार्यरत नागरी खलाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची तसेच हल्ल्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी संघटनेने केली आहे. संघटनेने सूरज यादव यांच्या कुटुंबीयांना मदत आणि न्याय मिळण्याची मागणीही केली आहे.

घटनेबाबत संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास सुरू असून, जहाजाचे मालक, व्यवस्थापन आणि RPSL यांच्यात समन्वय साधला जात आहे. सविस्तर अहवाल आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत माहिती अपेक्षित आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button