स्वर्गीय अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ देण्याची मागणी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांचे राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात तसेच राज्याच्या विकासाच्या वाटचालीत प्रदीर्घ काळ महत्त्वपूर्ण योगदान देणारे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांना मरणोत्तर देशातील प्रतिष्ठेचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत निवेदन सादर केले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, प्रशासकीय आणि विकासात्मक क्षेत्रातील अजितदादा पवार यांच्या प्रदीर्घ कार्याचा सर्वंकष विचार करून त्यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ या नागरी सन्मानाने गौरविण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्याने योगदान दिले. प्रशासनावरील मजबूत पकड, निर्णयक्षमता, विकासाभिमुख दृष्टिकोन तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता ही त्यांच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विकासाच्या विविध क्षेत्रांत योगदान
महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा, सिंचन, कृषी, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांसह विविध क्षेत्रांतील विकासकामांना गती देण्यात अजितदादा पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.
राज्याच्या अर्थकारणाला चालना देतानाच विविध भागांच्या विकासामध्ये समतोल साधण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामधील प्रभावी दुवा म्हणून त्यांनी काम केले. वेगवान निर्णयप्रक्रिया, प्रशासनातील शिस्त आणि विकासकामांबाबतची बांधिलकी यामुळे त्यांची स्वतंत्र कार्यशैली निर्माण झाली होती, असेही निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा
६०० व्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय! गॉलमध्ये श्रीलंकेचा १६५ धावांनी दारुण पराभव
‘योगदान एका पक्षापुरते मर्यादित नाही’
अजितदादा पवार यांचे सार्वजनिक जीवनातील योगदान हे केवळ एका राजकीय पक्षापुरते किंवा एका मतदारसंघापुरते मर्यादित नसून, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित असल्याचे तुषार कामठे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागांतील नागरिकांशी त्यांचा सातत्याने संपर्क राहिला. राज्याच्या विकासाशी निगडित विविध प्रश्नांवर त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यावर भर दिला. त्यामुळे त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक सेवेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणे ही महाराष्ट्रातील जनतेची भावना असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
‘पद्मविभूषण’ने गौरव करण्याची मागणी
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ योगदानाचा, महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या भूमिकेचा आणि लोकसेवेतील कार्याचा सर्वंकष विचार करून भारत सरकारचा ‘पद्मविभूषण’ हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात यावा, अशी नम्र परंतु ठाम मागणी तुषार कामठे यांनी केली आहे.
या मागणीचा राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे.




